देशभरात सुमारे १००० हून अधिक सिनेमांची निर्मिती सतत होत असते. ते जगभरात सुमारे ४० ते ४५ देशांमध्ये दाखवले जातात. पण तरीही बॉलिवूडला दुय्यम स्थान मिळते. बॉलिवूडही अग्रणी येऊ शकतं. फक्त त्यासाठी सिनेमा, टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. मीडियाने एकत्र येणे आणि महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने राज्यात मीडिया हब तयार करणे गरजेचे आहे, असे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान म्हणाला.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात ‘मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अॅण्ड एण्टरटेनमेन्ट’ या विषयावरील चर्चासत्रात तो बोलत होता. या चर्चासत्रात बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रितेश सिधवानीही उपस्थित होता. आपला देश तरुणांचा देश आहे. आता इथे प्रत्येकजणच ग्लोबल झाला आहे. त्यामुळे आपण मनाने जरी भारतीय असलो तरी मीडियाने जागतिक गोष्टींचा विचार करायला हवा, असा प्रेमळ संदेश शाहरुखने दिला.

आपल्याकडे नवे विचार, संकल्पना आहेत. या विचारांना जर अद्यावर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर आपण सगळ्याच बाबतीत अग्रणी असू. असा एकही देश नाही जिथे भारतीय तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे सर्वोत्कृष्ट विचार आणि तंत्रज्ञानाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो असं शाहरुख म्हणाला. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, देशात अजून सिनेमागृह उभी राहण्याची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. सव्वाशे कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात र फक्त ३ कोटी लोकांनीच जर दंगल पाहिला असेल तर ही विचार करण्याची गरज आहे. अशी लाखो चाहते असतील ज्यांना सिनेमागृहा अभावी सिनेमा पाहताच आला नाही. मीडियामुळे भारतात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यातूनच राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल.