सध्या लॉकडाउनच्या काळात इतर गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं असलं तरी सायबर गुन्ह्यांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. सध्या विविध मार्गाने सायबर क्राइम घडत असून त्याचा आकडा वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच यासंदर्भात नागरिकांना सजग होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट केलं आहे.

नागरिकांना सजग करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम विविध शक्कल लढवत असतात. यात अनेक वेळा ते चित्रपटांवरील मीम्स शेअर करत असतात. यावेळीदेखील सायबर क्राइमविषयी जनतेला माहिती मिळावी आणि त्यांच्यातील जागृकता वाढावी यासाठी त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील एक पोस्ट शेअर केलं आहे. हे पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेता सुबोध भावेने ट्विट करत पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांचे आभारही मानले आहेत.

“सायबर गुन्ह्याची ‘कट्यार’ तुमच्या अकाउंटमध्ये घुसू देऊ नका! जेव्हा तुम्हाला कोणी- ‘वेगवेगळ्या अकांऊटचे पासवर्ड वेगळे आहेत ना?’ असं विचारतं, तेव्हा अभिमानाने ‘खाँ साहेबांसारखं’ उत्तर द्या…बेशक हमारे पासवर्ड का कोई सानी नहीं. बहुत ही बुलंद और बेमिसाल हैं हमारा पासवर्ड, असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर सुबोध भावेने तात्काळ त्यावर रिट्विट केलं आहे.

“वाह वाह महाराष्ट्र पोलीस… तुमच्या कल्पना निरागस सुरासारख्या आहेत… आपल्या सुरक्षित हातांमध्ये महाराष्ट्राचं मनमंदिर तेजाने उजळून निघू दे”, असं रिट्विट सुबोधने केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र पोलीस कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनेतला सुरक्षित राहण्याचं आणि सजग राहण्याचं आवाहन करत असतात.