करोना विषाणूमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी देशात लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात वारंवार नागरिकांना घरात राहण्याचं, अनावश्यक कारणांसाठी बाहेर न फिरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील काही जण या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत. बऱ्याच वेळा ते हटके पद्धतीचा वापर करताना दिसतात. अलिकडेच महाराष्ट्र पोलिसांनी ‘गुलाबो सिताबो’ या आगामी चित्रपटाच्या टॅगलाइनचा अनोख्या पद्धतीने वापर करत नागरिकांना घरी राहण्याचं राहण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अभिनेता आयुषमान खुरानानेदेखील मराठीमध्ये ट्विट करत नागरिकांना घरी राहण्यास सांगितलं आहे.

अभिनेता आयुषमान खुराना आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या काळात चित्रपटगृह बंद असल्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनीदेखील नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यासाठी या चित्रपटाचा आधार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

“घर तुमचं, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची “परमिसन” आमची घ्यावी लागेल. तुमच्याच सुरक्षेसाठी. कोरोनाव्हायरस पासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वतःची “हवेली”. विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा. #StayHome #StaySafe मात्र प्रशासनाने, पोलिसांनी वारंवार सूचना दे”,असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केलं होतं. हाराष्ट्र पोलिसांचं हे ट्विट पाहिल्यानंतर आयुषमाननेदेखील लगेच ते रिट्विट करत “अगदी बरोबर. घरात सुरक्षित,बाहेर सध्या नाही”, असं मराठीत ट्विट केलं आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्र पोलीस आणि आयुषमान खुरानाने मराठी केलेलं ट्विट या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे. आयुषमान ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो आणि बिग बी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.