सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरांमधून जनजागृती केली जात आहे. तसेच पोलीस, डॉक्टर, सफाई कमागार आणि इतर अनेक लोक दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. तरी देखील लॉकडाउनच्या काळात अनेक लोक बाहेर फिरताना दिसत आहे. अशा लोकांसाठी महाराष्ट्र पोलीस विविध क्लुप्ता वापरुन घरात राहण्याचा संदेश देत आहेत. नुकताच त्यांनी अनोख्या पद्धतीने ट्विट करत लोकांना घरात थांबून करोनाला हरवण्याचा संदेश दिला आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी यावेळी जनजागृती करण्यासाठी ‘नटरंग’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘वाजले की बारा’चा वापर केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘वाजले की बारा’ गाण्यातील अमृता खानविलकरचा फोटो वापरला असून त्या फोटोवर ‘मला राहू द्या ना घरी’ असे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

अमृताचा गाण्यातील हा फोटो शेअर करत त्यांनी छान असा संदेश देखील दिला आहे. ‘आता घरी राहून बारा वाजवूया- कोरोनाव्हायरस चे!’ असा संदेश त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे. त्यांचे हे ट्विट नटरंग चित्रपटाचा दिग्दर्शक रवि जाधवने रिट्विट केले आहे.

नागपूर पोलिसांनी देखील सोशल डिस्टंस ठेवण्याचा म्हणजेच एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यासाठी ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाच्या स्टाइलमध्ये ट्विट केले होते. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या चेन्नई एक्सप्रेस या सुपरहिट चित्रपटाचे पोस्टर नागपूर पोलिसांनी ट्विट केले. या पोस्टरमध्ये एकमेकांपासून दूर बसलेले शाहरुख आणि दीपिका दिसत आहेत. “सोशल डिस्टंसच्या शक्तीला कमी समजू नका” अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर करण्यात आली आहे.