दिलीप प्रभावळकर यांची भावना

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दलचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. महात्मा गांधी यांची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. गांधी सामान्य माणसांना समजले पाहिजेत, या भावनेतून काम केले. ही भूमिका माझ्या आवडीची आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ने,तर  रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अँड साऊंड’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सिटी प्राईड कोथरूडचे मालक अरविंद चाफळकर, महोत्सव अध्यक्ष  डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते.

राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांच्यावतीने त्यांच्या मुलाने ‘हम साथ साथ है’ चित्रपटातील ‘ये तो सच है के भगवान है’ गीत सादर केले.

ग्लॅडिस फर्नाडिस आणि संतोष अवतरामानी यांच्या टँगो नृत्याने बहार आणली. प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन आणि क्षितिश दाते यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर गोन्जालो जस्टिनिअ‍ॅनो दिग्दर्शित ‘डॅम किड्स’ या  स्पॅनिश चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली.

पिफला निधी लवकरच मिळेल

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निधीमध्ये ३० टक्के कपात झाली असून त्याचा फटका पुणे आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवाला बसला आहे. यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवावर यांच्याशी चर्चा झाली असून शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनुदानामध्ये कपात होऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. ती त्यांनी मान्य केली असून महोत्सवाला उर्वरित निधी लवकरच मिळेल, असे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. यशवतंराव चव्हाण नाटय़गृह येथील कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.