‘प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं-आमचं सेम असतं’, असं कायम म्हटलं जातं. त्यामुळेच प्रेमाला कोणत्याही भाषेचं, जातीचं किंवा धर्माचं बंधन नसतं. सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरी तुफान गाजल्या आहेत. यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर. दाक्षिणात्य सुपरस्टार एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आणि पाहता पाहता तो महाराष्ट्राचा जावई झाला. आज या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यामुळेच चाहत्यांमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून महेश बाबूकडे पाहिलं जातं. अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्याची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. मात्र, अनेकींच्या गळ्यातलं ताईत झालेला हा अभिनेता मात्र नम्रताला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. एका कार्यक्रमात त्याने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे.

१९९३ च्या ‘मिस इंडिया फेमिना’चा किताब जिंकल्यानंतर नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ हा बॉलिवूड चित्रपट केला. या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर नम्रताने दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’ साईन केला होता. या चित्रपटामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी तो नम्रताच्या प्रेमात पडला. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याने नम्रतासमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण पुढे पुढे सरकत असताना त्यांचं प्रेम बहरु लागलं होतं, असं महेश बाबूने सांगितलं.

महेश बाबू नम्रताला डेट करत असल्याची गोष्ट फक्त महेशच्या बहिणीला माहित होती. तिच्या व्यतिरिक्त घरातील अन्य कोणत्याही सदस्याला या नात्याविषयी माहित नव्हतं. विशेष म्हणजे ही गोष्ट प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठीच त्याने घरातल्यांनादेखील सांगितलं नव्हतं. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.