आंध्र प्रदेश व तेलंगाणात पावसानं अक्षरशः तांडव घातला आहे. या मुसळधार पावसामुळे १९ जण मृत्युमुखी पडले असून अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या प्रतिकूल परिस्थितीत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने मदतीने हात पुढे केला. त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. शिवाय देशभरातील नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

बंगालच्या उपसागरात व काकीनाडा किनारपट्टी लगतच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. वातावरणात झालेल्या बदलांमुळे आंध्र प्रदेश व तेलंगणात पावसानं थैमान घातलं. आंध्र व तेलंगणातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, राजधानी हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडलं आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नजर ठेवून असून, युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. एसडीआरएफच्या तुकड्या पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे उस्मानिया विद्यापीठ व जवाहलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठाच्या आज व उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातही मंगळवारी झालेल्या पावसामुळे ४० गावांमधील ३५० घरांचं नुकसान झालं आहे.