दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा काल ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर महेश बाबूने कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता महेश बाबूने वाढदिवशी एक नवा विश्वविक्रम केल्याचे समोर आले आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत महेश बाबूने विश्व विक्रम केल्याची माहिती दिली आहे.’महेश बाबूच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे. सुपरस्टारच्या चाहत्यांनी सर्व विश्व विक्रम मोडले आहेत. चाहत्यांनी महेश बाबूला शुभेच्छा देण्यासाठी जवळपास ६०.२ मिलियन ट्विट्स केले आहेत. त्याबरोबर #hbdmaheshbabu #maheshbabu चा वापर केला आहे’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले. १९९३ च्या ‘मिस इंडिया फेमिना’चा किताब जिंकल्यानंतर नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ हा बॉलिवूड चित्रपट केला. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’ साईन केला होता. या चित्रपटामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले.