अभिनेत्री लविना लोध हिने एक चित्रफीत प्रसिद्ध करून अंमली पदार्थांच्या प्रकरणात खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक—निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी तिच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. न्यायालयानेही भट बंधूंविरोधात यापुढे कोणतेही बदनामीकारक विधान करू नये, असे निर्देश लोध हिला देत भट्ट बंधूंना अंतरिम दिलासा दिला.

विभक्त झालेला पती समीत सब्रवाल हा भट्ट बंधुंचा भाचा असून तो अंमलीपदार्थ तसेच मानवी तस्करीच्या व्यवसायात आहे. हा व्यवसाय महेश भट्ट चालवत असल्याचा आरोप करणारी चित्रफीत लोध हिने समाजमाध्यमावरून प्रसारित केली होती.

न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी तातडीची सुनावणी झाली. त्यावेळी लोध हिला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्या वेळी लोध हिच्याकडून भट बंधुंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले जाणार नसल्याचे तिच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. कायदेशीर नोटीस बजावूनही लोध हिने बदनामी न थांबवल्याने भट्ट बंधूंनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेत तिच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. ही चित्रफित समाजमाध्यमावरून काढून टाकण्याची मागणीही केली. सब्रवाल हा आपल्याशी थेट संबंधित नाही. तर तो आपल्या बहिणीच्या नवऱ्याच्या भावाचा मुलगा आहे, असे त्यांनी सांगितले.