हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. खार लिंकिंग रोड येथे आलेल्या १३ जणांना गुन्हे शाखेच्या मोटार चोरी विरोधी पथक आणि गुन्हे गुप्तचर विभाग यांनी अटक केली. या टोळीकडील वाहनांत मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडली आहेत. ही टोळी रवी पुजारीच्या आदेशानुसार काम करत होती. पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केल्याचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी सांगितले.
खार लिंकिंग रोड येथील मधू पार्क या इमारतीजवळ दहा जणांची टोळी एका दिग्दर्शक-निर्मात्याची हत्या करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. साध्या वेशात वावरणाऱ्या पोलिसांना एक टोळी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसताच पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यापैकी तिघांना पळून जाण्यात यश आले. मात्र, सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीकडून पोलिसांनी चार रिव्हॉल्व्हर, १५ जिवंत काडतुसे, नऊ मोबाइल आणि ११ लाख रुपयांची रोकड आणि एक मोटरसायकल जप्त केली. महेश भट्ट यांची हत्या करण्यासाठी या टोळीला ११ लाख रुपये मिळाले होते.

काय होता कट?
इशरत शेख, मोहम्मद खान, आजीम खान, अश्फाक सय्यद, आसीफ खान, शहानवाज शेख, फिरोज सय्यद, शब्बीर शेख, रहीम खान अशी या १३ पैकी नऊ जणांची नावे आहेत. हे सर्व मुंब्रा येथील कौसा भागात राहणारे आहेत. गरिबीमुळे गांजलेल्या या २५ ते ४५ वयोगटातील तरुणांनी ही सुपारी घेतली होती. या १३ जणांनी तीन पथके तयार केली होती. एका पथकाने मधू पार्क इमारतीची रेकी करून पूर्ण अभ्यास केला होता. तर दुसऱ्या पथकाने शस्त्रास्त्रांची व्यवस्था केली होती. या टोळीतील तिसरे पथक शनिवारी हा कट अमलात आणणार होते.