कलाविश्वामध्ये समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या कलाकाराला पुरस्कार रुपाने त्याच्या कामाची पोचपावती मिळत असते. या कलाकारांच्या कामाचं कौतुक व्हावं यासाठी कलाविश्वामध्ये अनेक वेळा विविध पुरस्कारांचं आयोजन करण्यात येत असतं. नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला. यात अनेक मराठी चित्रपटांनी, कलाकारांनी विविध विभागांसाठी पुरस्कार जिंकले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी केले. दरम्यान महेश कोठारे यांना ‘Excellence in Marathi Cinema’साठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

महेश कोठारे यांनी ट्विटवर ‘फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात’ असे म्हणत ट्वीट केले आहे. “फिल्मफेअरची ही ब्लॅक लेडी पुन्हा एकदा हातात धरताना खूप खूप आनंद होतोय. 1987 साली ‘धुमधडका’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट चित्रपट तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मला अशाच दोन ब्लॅक लेडी मिळाल्या होत्या. फिल्मफेअर ने पुन्हा एकदा मला ‘Excellence in Marathi Cinema’ साठी ही ब्लॅक लेडी प्रदान केल्याबद्दल मी त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, “मी हा पुरस्कार माझ्या ह्या प्रदीर्घ वाटचालीत ज्या सर्वांनी मला मोलाची साथ दिली. त्या सर्व उत्तम कलाकारांना, उत्कृष्ठ टेक्नीशियन्स ना आणि सदैव माझ्यावर प्रेम करत मला सदैव प्रोत्साहित करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना अर्पण करतो. कारण आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच आहे. तुम्हा सर्वांना माझ्या अंतःकरणापासून माझे धन्यवाद.”