News Flash

आकाश ठोसर जेव्हा नाशिकला जातो…

आकाश ठोसर याने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला

महेश मांजरेकर यांचा ‘एफयू’ म्हणजेच ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ हा सिनेमा येत्या २ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सध्या या सिनेमाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. ‘एफयू’च्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये प्रमोशनला हजेरी लावली होती.

दिग्दर्शक मांजरेकर यांनी या सिनेमाशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा तर केलीच याशिवाय ‘सैराट’ चित्रपटचेही भरभरून कौतुक केले. ‘सैराट’ चित्रपटाला यश आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळे मिळाले असे मांजरेकर यावेळी म्हणाले.
यावेळी ‘सैराट’ फेम आकाश ठोसर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, मयुरेश पेम, माधव देवचके, शुभम, पवनजीत अशा नव्या दमाच्या कलाकारांनी नाशिकमध्ये एफ.यू.चे जल्लोशात प्रमोशन केले.

‘सैराट’ फेम परश्या उर्फ आकाश ठोसर याने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ‘महाविद्यालयातील मित्रांसोबतची मजा, मस्ती मीही अनुभवली आहे. मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पात्र रंगवणे हे खूप आव्हानात्मक होते. पण महेश सरांनी माझ्याकडून चांगली मेहनत करून घेतली. चित्रपटातील प्रत्येक दृश्य, संवाद आम्हाला समजावून सांगितले. चित्रपटात १४ गाणी असल्याने या सर्व गाण्यावर डान्स करणे हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. कारण मला डान्स अजिबात येत नाही. परंतु हे आव्हानदेखील मी पेलले, असे आकाशने सांगितले. या चित्रपटासाठी काम करताना मला माझ्या भाषेवर मेहनत घ्यावी लागली. मी ग्रामीण भागातला आहे. त्यामुळे चित्रपटातील मुंबईतील महाविद्यालयीन तरुणाचे पात्र साकारायचे असल्याने यावर मी प्रचंड मेहनत घेतल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

fu-movie

लेखक अभिजित देशपांडे आणि महेश मांजरेकर यांनी मिळून या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात तब्बल १४ गाणी आहेत. याविषयी सांगताना मांजरेकर म्हणाले की, हा चित्रपट संगीताशी संबंधित असल्याने यात गाण्याची गरज होती. चित्रपट बघताना यातले एकही गाणे निरर्थक वाटणार नाहीत.

विशाल मिश्रा व समीर साप्तीकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून,सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, प्राजक्ता शुक्रे, बेनी दयाल, सुखविंदर सिंग, नीती मोहन, जोनिता गांधी या प्रसिद्ध गायकांनी गाणी गायली आहेत. सलमान आणि महेश यांच्यातले मैत्रीचे नाते तर सर्वांनाच माहित आहे. आता महेशचा चित्रपट आहे म्हटल्यावर सलमानही त्याला प्रमोट करणारच ना… सलमानने या चित्रपटासाठी ‘गच्ची’ हे खास गाणं गायलं आहे.

चित्रपटातील कथा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांभोवती फिरणारी आहे. अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांची आजच्या आधुनिक काळातील बदलती भाषा, त्यांच्यातील शहाणपण, मूर्खपणा, प्रेम, प्रेमभंग या सर्व गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘एफयू’ चित्रपटात मांजरेकर यांचा मुलगा सत्यादेखील दिसणार आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, माझा मुलगा सत्या या सिनेमात काम करू शकेल याची मला पूर्ण खात्री होती. त्याने अपेक्षेप्रमाणे काम केलेही. शिवाय चित्रपटात १४ गाणी असल्यामुळे हा चित्रपट करणे सोपे नव्हते. हे सर्व आव्हानात्मक होते. पण आव्हान आम्ही घेतलं असेही मांजरेकर म्हणाले.

अभिनेता बोमन इराणी, तसेच मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, आनंद इंगळे, इशा कोप्पीकर, शरद पोंक्षे आणि कश्मीरा शहा या कलाकारांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 9:09 pm

Web Title: mahesh manjarekar and sairat fame akash thosar marathi upcoming movie fu friendship unlimited press meet in nashik
Next Stories
1 PHOTOS: सुरू झाला दीपिकाचा ‘कान’ प्रवास
2 ‘सिमरन’ सिनेमाचा लेखक अपूर्व म्हणतो, ‘खोटं बोलतेय कंगना’
3 रजनीकांतच्या या कट्टर चाहत्याची गोष्ट ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Just Now!
X