सध्या कलाविश्वामध्ये अनेक स्टार किड पदार्पण करत आहेत. अनन्या पांडे, सारा अली खान अशा अनेक बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलांनी अभिनायच्या दुनियेत पदार्पण केले आहे. यामध्ये मराठी स्टार किड्स ही मागे नाहीत. अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई  मांजरेकर कलाविश्वाची वाट धरण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे मांजरेकरांचे संपूर्ण कुटुंबच या कलाजगतात योगदान देतय असे म्हणायला हरकत नाही.

ती लवकरच बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात ती सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या पूर्वी पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये ‘दबंग ३’ या चित्रपटातून महेश मांजेकरांची मोठी मुलगी अश्वमी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता तिचा अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करण्याचा विचार नसल्याचे म्हटले जात आहे.

आता अनेकांचे लक्ष भाईजान सलमानच्या या आगामी चित्रपटाकडे लागून राहिले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सलमान व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. सलमानचे ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ‘भारत’च्या यशाने त्याला दिलासा मिळाला आहे. ‘दबंग 3’ कडूनदेखील सलमानला खूप आशा आहेत.