महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व पु.लंच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पु.लंच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पु.ल. देशपांडेंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. या चित्रपटात अभिनेता सागर देशमुख पु.लंच्या भूमिकेत आहे. मात्र पु.लंच्या भूमिकेसाठी सागरच्या नावाला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पहिली पसंती नव्हतीच.

पु.लंची भूमिका ही अभिनेता ऋषिकेश जोशीनं साकारावी अशी मांजरेकर यांची इच्छा होती. मात्र ऋषिकेशऐवजी सागर या भूमिकेसाठी जास्त चांगला दिसेल असे मांजरेकर यांना सुचवण्यात आलं. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी देखील सागरची चेहरेपट्टी ही मेकअपनंतर जवळजवळ पु.लंच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती असल्याचं सांगितलं, म्हणून ऋषिकेशऐवजी सागरच्या नावावर या व्यक्तीरेखेसाठी शिक्कामोहर्तब करण्यात आलं असं महेश मांजरेकर ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना म्हणाले.

यापूर्वी आनंद इंगळे, अतुल परचुरे, निखील रत्नपारखी, अरूण नलावडे, संजय मोने यांनी रंगभूमी किंवा छोट्या पडद्यावर पु.लंची भूमिका साकारली होती. मात्र जे चेहरे लोकांनी यापूर्वी पाहिले त्यांना संधी न देता नवीन चेहरा लोकांसमोर ठेवायचा होता म्हणूनच सागर हिच योग्य निवड असल्याचंही मांजरेकर म्हणाले. ४ जानेवारी २०१९ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे दोन भागांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.