मराठी रंगभूमीतील गाजलेले नाटक ‘नटसम्राट’ आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. पण हा चित्रपट मराठीत येण्यापूर्वी तो हिंदीत करण्याची दिग्दर्शक महेश मांजरेकरांची इच्छा होती. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना घेऊन मांजरेकर हा चित्रपट हिंदीत करणार होते याबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र, त्यानंतर मांजरेकरांनी ‘नटसम्राट’ नाटकाचा मराठीतच चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात अमिताभना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत घेण्याचे ठरविले.
अमिताभ यांनी माझ्या मराठी चित्रपटात काम करावे अशी माझी इच्छा होता. त्यासाठी मी विचारणा केली असता त्यांनी मला होकारसुद्धा दिला. यानंतर चित्रपटासंदर्भात संपूर्ण टीमची मिटींग घेण्यात आली. त्यात बिग बींना चित्रपटात कुठे भूमिका देण्यात येईल याविषयी आम्ही चर्चा केली. पण चर्चेअंती सर्वांचे उत्तर ‘नाही’ असे होते, त्यामुळे बिग बींच्या भूमिकेची कल्पना आम्हाला वगळावी लागली. पण अमिताभ यांना घेऊन नक्कीच मी एक चांगला चित्रपट करेन, असे महेश मांजरेकर म्हणाले.
गेल्याच आठवड्यात अमिताभ यांनी ट्विटरवर ‘नटसम्राट’ चित्रपटाचा ट्रेलर, गाणे आणि मोशन पोस्टर ट्विट करून प्रशंसा केली होती. नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असेलला ‘नटसम्राट’ येत्या १ जानेवारीला प्रदर्शित होईल.