05 March 2021

News Flash

‘एफयू’ कॉलेज जीवनाचा ‘नॉस्टेल्जिया’!

‘नटसम्राट’नंतर थोडा हलकाफुलका चित्रपट करायचा होता. ‘एफयू’ चित्रपट खूप आधीपासूनच डोक्यात होता.

निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफ यू-फ्रेंडशिप अनलिमिटेड’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘सैराट’ नंतर आकाश ठोसरचा प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट. ‘कॉलेज लाइफ’चे दर्शन घडविणारा आणि त्या दिवसांच्या नॉस्टेल्जियात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह ‘एफयू’मधील आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, मयूरेश पेम, शुभम किरोडीअन, संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या गप्पांचा वृत्तान्त..

‘चित्रपटाबरोबर ‘तरुण’ होता आले’

‘नटसम्राट’नंतर थोडा हलकाफुलका चित्रपट करायचा होता. ‘एफयू’ चित्रपट खूप आधीपासूनच डोक्यात होता. मात्र काही कारणाने तो तेव्हा झाला नाही. हा चित्रपट पूर्णपणे तरुणांचा, त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाचा, महाविद्यालयीन जीवनात घडणाऱ्या गमतीजमतीचा आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार हे सगळे तरुण आहेत. त्यामुळे हा चित्रपट करताना मलाही ‘तरुण’ होता आले. चित्रपट करताना मी माझे महाविद्यालयीन जीवन पुन्हा एकदा जगलो. त्या आठवणीत गेलो. शाळेतून महाविद्यालयात गेल्यानंतर त्या मुलांचे सर्व जीवन बदलून जाते. पालक आणि मुलांनी दोघांनीही ते समजून घेतले पाहिजे. हा चित्रपट म्हणजे धमाल, मस्ती आणि मजा आहे. जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांना हा आपलाच चित्रपट वाटेल आणि जे आता पालकांच्या भूमिकेत आहेत त्यांना हा चित्रपट पाहून आपले महाविद्यालयीन दिवस आठवतील आणि त्यांचे स्मरणरंजन होईल. ‘सैराट’नंतर आकाश ठोसरचा हा प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट. या चित्रपटात आकाश तुम्हाला ‘परशा’ म्हणून नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत पहायला मिळेल. आकाशमधील ‘परशा’ पूर्णपणे काढून टाकून ‘एफयू’मध्ये त्याला ‘साहिल’च्या रूपात सादर केले आहे. त्यानेही ही नवी भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. ‘एफयू’ आणि ‘मुरांबा’ हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांचे विषय आणि शैली वेगळी असल्याने त्याचा एकमेकांना फटका बसेल असे मला तरी वाटत नाही. एका आठवडय़ाला दोन चित्रपट पाहता येतील अशी मराठी माणसाची आज स्थिती आहे. मराठी प्रेक्षक ‘बाहुबली’, ‘दंगल’ हे हिंदी चित्रपट महागडी तिकिटे काढून पाहू शकतो तर तुलनेत कमी दर असलेले ‘मुरांबा’ आणि ‘एफयू’ असे दोन्ही चित्रपट पहायला काहीच हरकत नाही. मराठी प्रेक्षकांनीही दोन्ही चित्रपटांना प्रतिसाद द्यावा आणि ते देतील असा विश्वास वाटतो. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे चित्रपटात एका विशेष भूमिकेत आहे. चित्रपटात एकूण १४ गाणी असून त्यातील एक गाणे सलमान खान याने गायले आहे. प्रेक्षकांना इतकी गाणी ऐकायची सवय नाही. पण या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षक कंटाळणार नाहीत. या गाण्यांनी चित्रपटात आपली स्वत:ची जागा तयार केली आहे. सलमान खानला घेऊन मराठी चित्रपट तयार करायचा विचार आहे. यात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत नव्हे तर मुख्य भूमिकेत असेल. पाहू या कधी जुळून येतोय हा योग. पण सलमानला घेऊन चित्रपट करणार हे नक्की. ‘एफयू’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ‘आनंद यात्रा’ असेल. चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही तरुणांना कोणताही सल्ला देण्याचा आव आणलेला नाही किंवा मुद्दामहून तसा प्रयत्नही केलेला नाही. मात्र जाता जाता त्यांना थोडे चिमटे काढले आहेत.

महेश मांजरेकर, दिग्दर्शक

‘माझ्या भाषेवर काम करवून घेतले’

महेश मांजरेकर सरांबरोबर काम करायचे आहे याची भीती सुरुवातीला होती. ते कसे असतील, एखादी गोष्ट नाही कळली किंवा करता आली नाही तर ते रागावतील का, माझे काम चांगले होईल की नाही अशा शंका मनात होत्या. पण महेश सरांबरोबर काम करायला लागलो आणि त्यांच्याबद्दलची भीती पळून गेली. संपूर्ण चित्रपटात त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतले. माझ्या भाषेवर, उच्चारांवर त्यांनी मेहनत घेतली. नृत्य व चित्रपटातील काही प्रसंगही त्यांनी प्रत्यक्ष मला करून दाखवले. चित्रीकरणाच्या वेळी ते आमच्यातलेच एक होऊन राहिले. त्यांच्या मोठेपणाचे दडपण त्यांनी कधीही जाणवून दिले नाही. चित्रपटातील मुख्य सहकलाकार आणि मी एकाच वयाचे असल्याने आमची खूप छान मैत्री झाली. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण करतो आहोत, असे वाटलेच नाही. आम्हा सगळ्यांची खूप मस्ती, धमाल चालायची. एकूणच चित्रपट करताना खूप मजा आली आणि खूप काही शिकायलाही मिळाले.

आकाश ठोसर

‘चित्रपटात आम्ही सगळेच महत्त्वाचे’

‘सैराट’मुळे आकाशचे नाव झाले होते. मात्र चित्रपटात त्याच्याबरोबर काम करताना कोणतेही दडपण आले नाही. तो आमचा खूप छान मित्र झाला. चित्रपट करताना खूप धमाल आली. चित्रपटात फक्त आकाशला महत्त्व दिले गेलेले नाही. त्या त्या पात्राला जसे महत्त्व द्यायला पाहिजे तसे ते दिले गेले आहे. त्यामुळे चित्रपटात आम्ही सगळेच महत्त्वाचे आहोत.

-मयूरेश पेम व शुभम किरोडिअन

‘चित्रपटात १४ गाणी’

‘एफयू’ चित्रपटात एकूण १४ गाणी असून ती मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत आहेत. चित्रपटातील सर्व गाणी श्रोत्यांना नक्की आवडतील. हा चित्रपट महाविद्यालयातील जीवनावर आहे. त्यामुळे यातली गाणी करताना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेंचं मिश्रण करण्यात आलं आहे. यातले ‘गच्ची’ हे गाणे सलमान खानने गायले आहे. त्याचा किस्सा सांगण्यासारखा आहे. हे गाणं खरं म्हणजे महेश मांजरेकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. अर्थात हे गाणं इतकं छान आहे, त्यातले जे शब्द आहे ते हलकेफुलके आणि गमतीशीर असे आहेत. त्यामुळे या गाण्याबद्दल सलमानने ऐकलं तेव्हा त्याने ते मी गाणार असं सांगितलं. त्यावेळी मला सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं. पण सलमानने ते अगदी परफेक्ट म्हटलं. आता चित्रपटात सलमानचं गाणं ऐकायला मिळतं.

समीर साप्तीस्कर, संगीतकार

‘पालकांनीही हा चित्रपट पाहावा’

चित्रपटाचे चित्रीकरण एक वर्षभर सुरू होते. महेश मांजरेकर यांच्याबद्दल सुरुवातीला दडपण होते. मात्र नंतर ते दूर झाले. ते आमच्यातीलच एक होऊन गेले. चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या आम्हा सर्व कलाकारांची खूप चांगली मैत्री झाली आहे. आकाशबद्दल मला खास करून सांगायचे आहे. ‘सैराट’मुळे त्याची जी प्रतिमा झाली आहे की तो एकदम शांत, साध्या-सरळ स्वभावाचा मुलगा आहे, ती एकदम खोटी आहे. तो अतिशय खोडकर आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनीच गमतीजमती केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट महाविद्यालयीन तरुणांचा जरी असला तरी पालकांनीही हा चित्रपट आवर्जून पाहावा.

संस्कृती बालगुडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 3:08 am

Web Title: mahesh manjrekar marathi movie fu cast and crew visit loksatta office for promotion
Next Stories
1 व्यसनाचा वटवृक्ष!
2 ‘बन मस्का’ संपतो तेव्हा..
3 अखेर ‘बाहुबली’ प्रभास परतला…
Just Now!
X