महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाचा दुसरा भाग पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पुरूषोत्तमचे पु.ल. देशपांडे कसे झाले, याची छोटीशी झलक या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

पुलंसारखा हुशार आणि साधे-सरळ, लोभसवाणे व्यक्तिमत्त्व असलेला सर्वसामान्य माणूस एक असामान्य, प्रतिभावंत लेखक, कलाकार म्हणून नावारूपाला येतो. हा प्रवास भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटातील पहिल्या भागात दाखवण्यात आला. पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळते आता दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पुल अशा प्रवासाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

आचार्य अत्रे, बाळा साहेब ठाकरे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे असे पुलंना भेटलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला भाई व्यक्ती की वल्लीचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे.