मे महिन्याच्या सुरुवातीस ‘जिंदगी’ वाहिनीवरून पाकिस्तानात गाजलेल्या मालिका प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाली आणि पाकिस्तानातील मालिका, कलाकार घराघरांत पोहचले. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या वाहिनीवरील ‘हमसफर’ मालिकेची अभिनेत्री माहिरा खान भारतभेटीमध्ये कोणत्याही कारणामुळे दोन राष्ट्रांमधील लोकांमध्ये भिंती उभारल्या गेल्या असल्या, तरी विविध देशांतील कलेवर मात्र कोणतीही बंधने नसावीत अशी इच्छा व्यक्त केली.
पतीपत्नीच्या नाजूक नातेसंबंधावर भाष्य करणारी पाकिस्तानी मालिका ‘हमसफर’ अल्पावधीत पाकिस्तानात लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील कलाकार फवाद खान आणि माहिरा खानसुद्धा तरुणाईचे लाडके चेहरे बनले होते. ‘जिंदगी’ वाहिनीच्या निमित्ताने ही मालिका भारतीय प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये पोहचली आणि फवाद, माहिराच्या चाहत्यांची यादी भारतातही तयार होऊ लागली. यानिमित्ताने भारतात आलेल्या माहिराने पत्रकारांशी बोलताना ही मालिका भारतात प्रक्षेपित होण्यापूर्वीच आपल्याला भारतात यायचे होते; परंतु व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने यायला उशीर झाल्याचे सांगितले.
या वाहिनीच्या निमित्ताने पाकिस्तानातील मालिका आणि कलाकार भारतीयांना परिचयाचे झाले याचा आनंद व्यक्त करताना ती लहानपणापासूनच भारताशी जोडली गेल्याचे सांगते. लहानपणी तिने आजीआजोबांकडून फाळणीपूर्वीच्या दिल्ली, मेरठच्या गोष्टी ऐकल्या आहेत. बॉलीवूड सिनेमा म्हणजे पाकिस्तानात लोकांचा जीव की प्राण आहे. अगदी ‘सिलसिला’पासून ते ‘रामलखन’पर्यंत प्रत्येक सिनेमा तेथील प्रत्येक पिढीने आवडीने पाहिल्याचे ती सांगते. अर्थात पण त्याच वेळी भारतात मात्र आमची कला पोहचण्यास इतका वेळ लागल्याबद्दलचे दु:खही ती व्यक्त करते. म्हणूनच जमिनीवर दोन देशांमध्ये कितीही मोठय़ा भिंती बांधल्या गेल्या असल्या, तरी कलेवर, साहित्यावर मात्र असे कोणतेही बंधन नसावे आणि दोन्ही देशांतील लोकांनी एकमेकांच्या साहित्यावर, कलाकृतींवर भरभरून प्रेम करावे, अशी आशा ती व्यक्त करते. ज्याप्रमाणे पाकिस्तानी जनतेच्या मनामध्ये भारताचे चित्रवरून ठरलेले आहे त्याचप्रमाणे भारतीयांच्या मनामध्ये माध्यमांमुळे दहशतवाद, दंगलींमध्ये अडकलेला चेहरा असे काहीसे चित्र आहे, पण त्यापेक्षा आधुनिक पाकिस्तान खूप वेगळा असल्याचे नमूद करताना, पाकिस्तानामध्येसुद्धा मोकळे, पुढारलेले वातावरण आहे आणि ते कदाचित या मालिकांच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल, असे तिचे म्हणणे आहे.
लहानपणापासूनच हिंदी सिनेमासृष्टीशी जोडली गेलेली माहिरा आपण शाहरुख खानची चाहती असल्याचे मान्य करते आणि संधी मिळाल्यास शाहरुख आणि सध्याच्या फळीतील रणबीर कपूरसोबत काम करायला आवडेल असे सांगते.