अभिनेत्री माहिरा शर्मा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आली. परंतु बिग बॉसमधून बाहेर पडताच तिने चर्चेत राहाण्यासाठी चक्क ‘दादासाहेब फाळके’ या नामांकित पुरस्काराचा आधार घेतला. परिणामी प्रसिद्धीसाठी केलेला हा विचित्र प्रकार आता तिच्या अंगाशी आला आहे.

काय केले माहिराने?

माहिराने काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिला ‘दादासाहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित केल्याचा दावा तिने केला होता. बिग बॉसमधील सर्वात फॅशनेबल स्पर्धक म्हणून तिला हा पुरस्कार मिळाल्याचे तिने म्हटले होते. परंतु ‘दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय पुरस्कार’ समितीने हा दावा फेटाळून लावला आहे. असा कुठलाही पुरस्कार त्यांनी तिला दिलेला नाही.

काय म्हणाली ‘दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय पुरस्कार’ समिती?

असा कुठलाही पुरस्कार किंवा प्रमाणपत्र माहिरा शर्माला देण्यात आलेले नाही. तिने सोशल मीडियावर बनावट प्रमाणपत्र दाखवले. याबाबत माहिराने लवकरात लवकर माफी मागावी. आणि खरे काय ते सर्वांना सांगावे. अन्यथा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ समितीमार्फत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा तिला देण्यात आला आहे.

दरम्यान या खोट्या पुरस्कारावरुन माहिराला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. कारण दादासाहेब फाळके या भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. परिणामी तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.