17 October 2019

News Flash

रंगकर्मी अशोक मुळ्ये संकल्पित ‘माझा पुरस्कार’सोहळा सोमवारी रंगणार

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा ‘माझा पुरस्कार’ सोहळा १२ जानेवारी रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे

| January 9, 2015 12:56 pm

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा ‘माझा पुरस्कार’ सोहळा १२ जानेवारी रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. रात्री साठेआठ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या द्वंद्व गीतांचा ‘धुंदी कळ्यांना’ ही संगीत मैफलही होणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (चित्रपट-डॉ. प्रकाश बाबा आमटे), लेखक व दिग्दर्शक समीर पाटील (पोश्टर बॉइज), सूर्यकांत गोवळे (नाटक-कळत नकळत), अभिनेता ऋषीकेश जोशी (चित्रपट-पोश्टर बॉइज), पत्रकार श्रीकांत बोजेवार ऊर्फ तंबीदुराई (लेखन) यांना ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटांचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना ‘पहिला महाराष्ट्र फाळके’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भ्रमणध्वनीवरील ‘एम-इंडिकेटर’ हे अ‍ॅप्लिकेशन तयार करणारे सचिन टेके तसेच दहिहंडीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी आणि सर्वात वरच्या थरावर लहान मुलांना पाठवू नये, यासाठी न्यायालयीन लढाई केलेल्या आणि आता मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणूनही न्यायालयात याचिका दाखल केलेल्या स्वाती पाटील यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार केला जाणार आहे.  ‘धुंदी कळ्यांना’ या कार्यक्रमात मंदार आपटे व केतकी भावे हे सुधीर फडके व आशा भोसले यांची द्वंद्वगीते सादर करणार असून निवेदन आणि संगीत संयोजन अनुक्रमे धनश्री लेले व प्रशांत लळीत यांचे आहे. विजय तांबे, श्रुती भावे, अमित पाध्ये, सूर्यकांत सुर्वे, अर्चिस लेले, जगदीश मयेकर हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असून शिल्लक मोजक्या प्रवेशिका शनिवारपासून शिवाजी मंदिर येथे दिल्या जाणार आहेत.  

First Published on January 9, 2015 12:56 pm

Web Title: majha puraskar held on monday