ज्या अभिनेत्यासाठी प्रेक्षकांना आपलेपणाची भावना आहे असा कलाकार म्हणजे ‘मकरंद अनासपुरे’. त्याच्या अभिनय कौशल्याने तो महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतोय. त्याचा विनोदी बाज आणि वैदर्भी ठसका प्रेक्षकांना चांगलाच भावला आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक चित्रपटाने प्रत्येक गल्लीत गोंधळ करत, दे धक्का म्हणत बॉक्स ऑफिस गाजवलं. अभिमानाची गोष्ट म्हणजे मकरंद हा अभिनयासोबतच समाजकार्यात देखील तितकाच कार्यरत आहे. अशा या प्रतिभावान आणि माणुसकी जपणाऱ्या कलाकाराचा वाढदिवस झी टॉकीज वाहिनी अगदी जोरदार साजरा करणार आहे.

मकरंदच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीज मकरंदचे काही दर्जेदार चित्रपट सादर करून महाराष्ट्रातील घराघरात हास्याची लाट घेऊन येणार आहेत. २२ जुलै रोजी झी टॉकीजवर सकाळी ९ वाजल्या पासून प्रेक्षकांना मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटाचा आस्वाद घेता येणार आहे. मकरंद अनासपुरे चित्रपट महोत्सवात सकाळी ९ वाजता डावपेच, ११ वाजता गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, दुपारी १.३० वाजता निशाणी डावा अंगठा, ७ वाजता दे धक्का आणि रात्री ९.३० वाजता गाढवाचं लग्न हे चित्रपट प्रसारित होणार आहेत.

प्रेक्षक देखील घरबसल्या त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या चित्रपटाचा आनंद घेऊन मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस साजरा करू शकतील. मकरंद अनासपुरे चित्रपट महोत्सव बुधवार २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून झी टॉकीज वाहिनीवर सुरू होणार आहे.