हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी मंडळींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. यात अभिनय, संगीत, कला दिग्दर्शन, गायन, रंगभूषा अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. मराठी असलेले विद्याधर भट्टे गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. बॉलीवूडमध्ये दिग्गज कलाकारांना रंगविणाऱ्या भट्टे यांनी मराठी चित्रपटासाठी मात्र आजवर काम केले नव्हते. निर्माते-दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या आगामी मराठी चित्रपटासाठी रंगभूषाकार म्हणून ते काम करत आहेत.
भट्टे यांनी आजवर राणी मुखर्जी, अनुष्का शर्मा, विद्या बालन, श्रीदेवी यांचे वैयक्तिक रंगभूषाकार म्हणून काम केले आहे. तसेच अन्य काही हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी तेलुगू, तामिळ चित्रपटांसाठीही काम केले. आता ‘चूक भूल द्यावी घ्यावी’च्या निमित्ताने भट्टे पहिल्यांदा मराठीत काम करत आहेत.
या संदर्भात चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विजू माने यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झालेले रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांना या चित्रपटासाठीच्या रंगभूषेबद्दल मी विचारणा केली. त्यांनी मैत्री आणि माझ्यावरील प्रेमापोटी या चित्रपटासाठी रंगभूषाकार म्हणून काम करण्यास होकार दिला. हिंदी चित्रपटसृष्टीत व्यग्र असलेला भट्टे यांच्यासारखा रंगभूषाकार या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत काम करत आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, मकरंद अनासपुरे, हेमांगी कवी, रमेश देव, सीमा देव, विजू खोटे आदी कलाकार आहेत.
हा चित्रपट ‘रोड मूव्ही’ या प्रकारातील आहे. मोठय़ा महानगरातून गेल्या तीन वर्षांत लग्न झालेल्या जोडप्यांपैकी ७५ टक्के जोडप्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला असल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. अगदी क्षुल्लक कारणांवरून या जोडप्यांची घटस्फोटापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे. असे का झाले असावे असा विचार केला तर ‘इगो’ हा घटक याला जबाबदार असल्याचे दिसून येते. आपण ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ असे म्हणायला विसरलो आहोत. हा गंभीर विषय चित्रपटातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे माने म्हणाले. तर रंगभूषाकार भट्टे यांनी सांगितले की, या चित्रपटात जितेंद्र जोशी ‘लेखक’ ही भूमिका करत आहे. एक लेखक म्हटला की सर्वसामान्यांच्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. चित्रपटातील जितेंद्र जोशीला त्याच्या नेहमीच्या दिसण्यापेक्षा आम्ही वेगळा ‘गेटअप’ दिला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मराठीत काम करत आहे. खूप चांगला अनुभव या निमित्ताने मिळाला आहे.