News Flash

मेकअप अंतर्मनातील बदलाची प्रक्रिया

मेकअपच्या निमित्ताने या त्रिकुटाने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देऊन गप्पा मारल्या..

(संग्रहित छायाचित्र)

सध्या समाजमाध्यमावर चिन्मय उद्गीरकर आणि रिंकू राजगुरू जोडीच्या ‘मेकअप’ या चित्रपटाचा ट्रेलर गाजतो आहे. चिन्मय-रिंकूची जोडगोळी, गणेश पंडित यांच्या दिग्दर्शनात तर संगीतकार सलीम सुलेमान यांचे मराठीत पदार्पण असलेला ‘मेकअप’ म्हणूनच वेगळा ठरणार आहे. ‘सैराट’ आणि ‘कागर’ नंतर रिंकू पुन्हा एकदा वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर येते आहे. यानिमित्ताने या त्रिकुटाने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देऊन गप्पा मारल्या..

‘मेक अप’ हे नाव त्याच्या कथानकावरून पडले. कथा, पटकथा आणि नंतर संवाद अशी चित्रपटाची मांडणी होत गेली. मेकअप हा समस्त महिलावर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. चांगले दिसण्यासाठी मेकअप करण्यात येतो. इथे एक वेगळा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काही बदल करायचे असतात. काही गोष्टींमध्ये सुधारणा करणे त्यांना क्रमप्राप्त असते. हा मेक अप नातेसंबंधांचा, परिस्थितीचा, दिसण्याचा तसेच असण्याचाही असू शकतो. या गोष्टींतील बदलाची प्रक्रिया म्हणजे हा चित्रपट आहे. बाहेरच्या बदलाबरोबरच अंतर्मनातील बदलाची ही गोष्ट आहे, असे दिग्दर्शक गणेश पंडित यांनी सांगितले.

घरात साधी सोज्वळ, सुसंस्कृत राहणारी पूर्वी बाहेर बिनधास्त, निडर, निर्भीड विचारांची दाखवली आहे. गावातून पुण्यात स्थायिक झालेले कुटुंब असल्याने शहरी आणि ग्रामीण वातावरणाचा प्रभाव तिच्यावर पडलेला दिसून येतो. आपल्या बोलण्या आणि वागण्याने पहिल्याच भेटीत ती आपली छाप सोडून जाते. पूर्वीच्या व्यक्तिरेखेत मनाचा आणि बुद्धीचा उत्कृष्ट ताळमेळ साधला गेला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वावर  न्युरोसर्जन असलेला नील पूर्वीवर फिदा होतो. अमेरिकेत न्युरोसर्जरी शिकून आलेला तरुण डॉक्टरचा पूर्वी कसा मेकअप करते, मात्र दुसऱ्या व्यक्तीचा मेकअप करण्याआधी स्वत:वर प्रेम असणे गरजेचे असते, तसे पूर्वीचे स्वत:वर प्रेम आहे, असे चिन्मय सांगतो.

‘नांदा सौख्यभरे’ मालिकेतील नील आणि ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ मालिकेतील अक्षय या दोन्ही भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या चिन्मयच्या मते मालिका आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत काम करताना फारसा काही फरक जाणवत नाही. मालिकेची प्रसिद्धीची गणिते वेगळी असू शकतात. चांगले काम केल्यास त्याची दखल घेतली जाते, असे त्याचे मत आहे. मालिकेत काही भाग झाल्यावर ती व्यक्तिरेखा लोकप्रिय होते. तर चित्रपटात त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून ती कॅमेऱ्यासमोर साकारावी लागते, असे तो सांगतो. मालिकेत दाखवण्यात येणारा पुनर्जन्म, नाटय़ यामुळे नकारात्मक प्रतिसाद मिळतो, कारण ते प्रेक्षकांना आवडत नाही. मात्र यातून धडा घेऊन चांगले काम करत राहायचे, असेही त्याने सांगितले.

‘सैराट’, ‘मानसु मलिंगे’ आणि ‘कागर’ या चित्रपटांमुळे मी फक्त ग्रामीण बाजाच्या भूमिका करू शकते, हा माझ्यावर बसलेला शिक्का पुसून टाकायचा होता. मला एक कलाकार म्हणून एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायचे नव्हते. ‘मेकअप’ हा चित्रपट माझ्यासाठी एक प्रकारे वेगळा प्रयोगच आहे. पूर्वी साकारताना माझा लुकबदलण्यात आला. मला थोडे पाश्चात्त्य प्रकारचे कपडे देण्यात आले. नवीन केशरचना करण्यात आली. हे मला खूप जड गेल्याचे रिंकू सांगते. नवीन केशरचनेमुळे मला प्रचंड राग येत होता, परंतु हळूहळू चित्रपटाच्या टीमकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे माझा आत्मविश्वास दुणावला. पूर्वीचे कुटुंब गावातून पुण्यात स्थायिक झाल्याने तिची भाषा शहरी आणि ग्रामीण अशा संमिश्र पद्धतीची दाखवायची होती. यासाठी मी भाषा, कपडे आणि केशभूषा यावरही काम केले. चित्रपटाचे नाव ‘मेकअप’ असले तरी आपल्याला सौंदर्यप्रसाधने फारसे आवडत नसल्याचे रिंकू सांगते.

या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय अशी नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चिन्मयला रिंकूचा साधेपणा सर्वात जास्त भावतो. तिच्या या वेगळेपणाविषयी चिन्मय सांगतो की, ‘अत्यंत लहान वयातही मोठे यश मिळूनसुद्धा रिंकूचे पाय अजून जमिनीवरच आहे. तिला आपल्या असण्याचा आणि दिसण्याचा गर्व नाही. तिचा राज्यभरात एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. आजही ती काम नसल्यास अकलूजला रहाते. तिच्या वागण्यातील स्पष्टवक्तेपणा मला जास्त आवडतो, असे चिन्मयने सांगितले.

‘सैराट’मुळे रिंकूच्या अभिनयाची दखल घेत तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. हा चित्रपट यशस्वी झाल्यावर रिंकू रातोरात स्टार झाली. तिच्या आयुष्यातील छोटी गोष्ट अनेक प्रसारमाध्यमांच्या बातमीचा विषय बनली. एका रात्रीत तिचे नाव प्रकाशझोतात आले. या यशाचा तिच्या जीवनावर काय परिणाम झाला, याबद्दल तिला विचारले असता ‘या यशाने रिंकू राजगुरू या नावाला प्रेक्षक ओळखायला लागल्याचे  ती आवर्जून नमूद करते. आधी अकलूजमध्ये कोणी विचारत नव्हते नंतर मला बाहेर पडण्यासही अडचण व्हायला लागली. रोज लोक येऊन फोटो आणि सही देण्यासंबंधी विचारत होते. परंतु या यशामुळे माझ्या वागण्यात काडीचाही फरक पडला नाही,’ असेही रिंकूने सांगितले. रिंकूची लोकप्रियता अजूनही तेवढीच आहे त्यामुळे तिला घेऊन  पुण्याच्या रस्त्यावर चित्रीकरण करणे हे स्वप्नवत असल्याचे मत गणेश यांनी व्यक्त केले. अनेकदा बघ्यांच्या गर्दीमुळे चित्रिकरण थांबवावे लागले, असेही त्यांनी सांगितले. अभिनयाची उपजत देणगी मिळालेली रिंकू अभ्यासातही हुशार आहे. चित्रपटाच्या व्यग्र वेळापत्रकातूनही ती अभ्यासाला महत्व देते. गेल्या वर्षी तिने कला शाखेतून बारावीची परीक्षा देत ८२ टक्के गुण मिळवले होते. सध्या ती पदवीचे शिक्षण घेते आहे. आई-वडील अकलूजला शिक्षक असल्याने घरात शिक्षणाचे महत्त्व असल्याचे, रिकूंने स्पष्ट केले.

गूळताक प्रकरण

प्रत्येक माणसाची एक अजब तऱ्हा असते. त्याप्रमाणे रिंकू आणि चिन्मयच्याही आवडीनिवडीच्या अजब तऱ्हा आहेत. रिंकूला गुळाबरोबर ताक प्रचंड आवडतं. त्यामुळे लहर आल्यास ती गूळताक खाते. तर चिन्मय जिमच्या वेळेस घ्यायचे प्रोटिन्स चहात टाकून घेतो. चहामध्ये साखरेऐवजी हे प्रोटिन्स टाकून पीत असल्याचे चिन्मयने सांगितले.

सेटवरील गंमत

‘मेकअप’ चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात झाले असून, या वेळेस गणेश आणि रिंकू यांनी चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगितले. ‘मी आधी अनेक चित्रपटांचे लेखन केले असले तरीही दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मी चित्रीकरण कसे होणार या काळजीत होतो. परंतु चित्रीकरण करताना माझी भीती या दोघांनी आणि टीमने दूर केली. रिंकू, चिन्मय यासह सहकलाकारांनी मला सहकार्य केले. ज्या लोकांच्या घरात चित्रीकरण झाले त्यांनीही आपणहून मदत केली. त्या घरातील महिलांनी रिंकूला कपडे, दागिने घालण्यास दिले. चित्रीकरण करताना एकदाही सेटवर भांडण, वाद झाले नाहीत. या दोघांना त्यांची व्यक्तिरेखा चांगली माहिती असल्याने काही सांगावे लागले नाही. अगदी स्पॉटबॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत सर्वाना कोणतेही काम करण्यास कमीपणा वाटला नाही. आज चित्रपटाचा ट्रेलर पाहताना प्रत्येक दृश्यागणिक सेटवर केलेली मजा मस्ती आठवते’, असेही गणेश पंडित यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:36 am

Web Title: makeup marathi movie team interview abn 97
Next Stories
1 प्रयोगशील हिना
2 विदेशी वारे : क्रेगचा अखेरचा ‘बॉण्ड’पट
3 ‘‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटय़गृहाची स्वप्नपूर्ती होणार!’
Just Now!
X