‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’सह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेला ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहता येणार आहे. ‘स्टार प्रवाह’वर रविवारी २ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरेची आजवरची वेगळी दमदार भूमिका, मराठीत यापूर्वी सादर न झालेला विषय आणि मांडणी यामुळे हा चित्रपट लोकप्रिय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रंगा पतंगा’या चित्रपटात जुम्मन या विदर्भातील शेतकऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. आजुबाजूला भवताल बदलत असताना बलजोडी सांभाळून शेती करणाऱ्या आणि ही बलजोडी हरवल्याने त्यांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्याला सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचे चित्रण हा सिनेमा करतो. वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट उलगडताना सामाजिक परिस्थितीवर आणि व्यवस्थेच्या अनास्थेवरही हा सिनेमा मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. मकरंद अनासपुरे, नंदिता धुरी, संदीप पाठक, गौरी कोंगे, भारत गणेशपुरे, उमेश जगताप, तेजपाल वाघ आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा चिन्मय पाटणकर, पटकथा-संवादलेखन आणि दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांचं आहे. इलाही जमादार यांच्या अर्थपूर्ण गीताला कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलं आहे. एकच गीत गझल आणि कव्वाली या दोन प्रकारांत संगीतबद्ध करण्याचा वेगळा प्रयोग या चित्रपटात झाला. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यांचे एकंदर चित्रपटाच्या आशयाला अधोरेखित करणारे छायांकन हेही या चित्रपटाचे ठळक वैशिष्टय़.

या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली आहे. १४ व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ आणि प्रसाद नामजोशी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला होता. इटलीतील ‘रिव्हर टू रिव्हर’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेला हा एकमेव मराठी चित्रपट होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makrand anaspure movie ranga patanga on star pravah
First published on: 02-04-2017 at 00:32 IST