मकरंद देशपांडे यांच्या ‘स्पॉट ऑन’ लोकांकिकाच्या मंचाशी खास नाते

शास्त्रज्ञ संपावर गेले तर..?, या संकल्पनेवर अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी ‘स्पॉट ऑन’ या नाटकाची निर्मिती केली आहे. मकरंद देशपांडे यांच्याच लेखणीतून उतरलेल्या आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘स्पॉट ऑन’ या नाटकाचे ‘लोकसत्ता लोकांकिका’ या मंचाशी खास नाते जुळलेले आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मकरंद देशपांडे उपस्थित राहिले होते. या मंचावर तरुण कलाकारांच्या एकांकिकांनी भारावून गेलेल्या देशपांडे यांनी याच मंचावर एखादा नाट्यविष्कार सादर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेतून ‘स्पॉट ऑन’ या नाटकाचा जन्म झाला आहे. ज्याची खास झलक यावेळी उपस्थितांना पहायला मिळाली.

‘लोकसत्ता’च्या अंकातील ‘शेतकरी संपावर गेले तर’ या लेखावरून त्यांना ‘स्पॉट ऑन’ या नाटकाची कल्पना सुचली. शास्त्रज्ञ संपावर गेले तर.. असा विषय घेत त्यांनी सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य केले आहे. प्रवाहाबरोबर राहणाऱ्यांना कुठलीही अडचण येत नाही. मात्र, प्रवाहाबरोबर जाणे नाकारून वेगळी भूमिका मांडणाऱ्यांचा बळी घेतला जातो, या वास्तवावर त्यांनी या नाटकांतून बोट ठेवले आहे. अशा असहिष्णू वातावरणात बुध्दीवंताचा आणि तात्विकतेने वागणाऱ्यांची कशी घुसमट होते, याचे अस्सल चित्रण त्यांनी या नाटकात केले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हुशार आणि प्रामाणिक शास्त्रज्ञावर व्यवस्थेविरुध्द जाण्याच्या निर्णयाला गोळीबाराच्या रुपाने प्रतिसाद मिळतो. या घटनेने हादरलेले त्याचे कुटुंब, त्याची दोन मुले आणि पत्नी यांची होणारी ससेहोलपट आणि त्यांचा आपापसातील संवाद-वर्तन यातून हे नाटक उलगडत जाते. या नाटकात मकरंद देशपांडे यांच्यासह समिधा गुरू, आकांक्षा घाडी आणि असीम हट्टंगडी यांच्या भूमिका आहेत.

‘लोकसत्ता लोकांकिका’ या महाअंतिम सोहळ्यात या नाटकाची खास झलक रसिकांसमोर सादर झाली. काही कारणास्तव यावेळी मकरंद देशपांडे उपस्थित राहू शकले नाहीत.

एकांकिकेचे विषय, त्याबद्दलचे गांभीर्य, संशोधन, सादरीकरणाची शैली यांमध्ये डोळसपणा दिसून आला. एकांकिका स्वत:साठीच असते असा आत्तापर्यंतचा भ्रम यातील बऱ्याच एकांकिकांनी तोडला आणि एकांकिका हे प्रेक्षकाभिमुख आहे अशी जाणीव या एकांकिका पाहून झाली आहे.

 – कमलाकार सोनटक्के, ज्येष्ठ नाटय़कर्मी

********

शहरातील स्पर्धकांच्या तुलनेत बाहेरील स्पर्धकांना नाटकाचे व्यासपीठ फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आर्थिक मर्यादा, उपलब्ध साधनसुविधांमधून वाट काढत हे विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाच्या एकांकिका सादर करत आहेत. रंगभूमीवर करू पाहता येणाऱ्या सर्व शक्यता ते हाताळून पाहत आहेत. त्यांच्यातील नाट्यगुणांचा विकास व्हावा यासाठी कार्यशाळा होणे गरजेचे आहे.

– गिरीश पत्की, दिग्दर्शक

********

गेल्या काही वर्षांपासून संवादांपेक्षा ध्वनी आणि सादरीकरणावर अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जातो. लोकांकिकेतही ध्वनी आणि दृश्य परिणामांवर भर दिलेला दिसतो. सध्या एकूणच नाटकांना कमी प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा आणि टीव्हीत चíचला जाणारया विषयांपेक्षा वेगळे विषय नाटकाद्वारे मांडावेत.

– विजय केंकरे,  प्रसिद्ध अभिनेते

********

विद्यार्थी प्रतिक्रिया

महाअंतिम फेरीसाठी सर्व दर्जेदार संघ आहेत. नव्या कलाकारांना लोकांकिकेमुळे संधी मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड केल्यामुळे सर्वाना समान संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी आणि मिळणारे मार्गदर्शन यांमुळे सहभागी संघांना भविष्यात सुधारणा करण्यासाठी उपयोग होईल.

– मंदार गोखले, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे</strong>

********

प्रथमच ‘लोकसत्ता लोकांकिके’मध्ये सहभागी झालो. पहिल्या प्रयत्नात महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली हे महत्त्वाचे. एकांकिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद झाला. अनेक मोठय़ा कलाकारांसमोर सादर करण्याची संधी मिळणे ही मोठी बाब आहे.

– शुभम रॉय, औरंगाबाद, बामु  विद्यार्थी, एमबीए प्रथम वर्ष, माणसं

********

‘लोकसत्ता’ने दिलेली ही संधी खरंच उत्तम आहे. याआधी पुणे-मुंबईसारख्या शहरांतच अशी संधी मिळत होती. लोकांकिकेमुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. दिग्गज परीक्षकांचे मार्गदर्शन हा अजून एक या स्पर्धेचा महत्त्वाचा भाग आहे.

–  मुकुंद मोरे, एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके महाविद्यालय, नाशिक

********

कलाकारांना पर्वणी

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचापासून प्रेरणा घेऊन या नव्या पर्वात दिग्दर्शक-अभिनेता मकरंद देशपांडे यांनी ‘स्पॉट ऑन’ या नाटकाची निर्मिती केली. या नाटकाची खास झलक त्यांनी महाअंतिम सोहळ्यात सादर केली. याच मंचावरून मकरंद देशपांडे यांच्या वतीने यावर्षीच्या स्पर्धेतील कलाकारांसाठी जानेवारीत एक खास कार्य़शाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या पहिल्या तीन एकांकिकांचे प्रयोग अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अलिबाग शाखेतर्फे अलिबागमध्ये करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश पत्कींसारख्या नाट्यकर्मीनी लोकसत्ता लोकांकिकाच्या स्पर्धकांसाठी लेखन कार्यशाळा घेणार असल्याचे जाहीर केले.