रेश्मा राईकवार

मराठी व्यावसायिक रंगभूमीवरची ‘एपिक गडबड’ चांगलीच रंगली असताना केवळ लेखक-दिग्दर्शक म्हणून नाही तर अभिनेता म्हणूनही मराठी रंगभूमीवर नव्याने प्रवेश करायचा निर्धार मकरंद देशपांडे यांनी केला आहे. गेली तीस वर्षे हिंदी-इंग्रजी रंगभूमीवर नवनवीन विषय-कथामांडणी, अभिनयातील प्रयोग यांच्या माध्यमातून सक्रिय असलेले मकरंद देशपांडे ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ हे नवीन मराठी नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनय अशा तिन्ही भूमिकांमधून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

हे वर्ष ‘एपिक गडबड’ने गाजवल्यानंतर मकरंद देशपांडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ हे नवीन नाटक या आठवडय़ात रंगभूमीवर दाखल होतं आहे. १९ डिसेंबरला गुरुवारी ठाण्यात गडकरी रंगायतन येथे दुपारी ४ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. सर, फणिधर आणि सरला या तिघांभोवती या नाटकाची कथा फिरते. नावाप्रमाणेच ही प्रेमाची गोष्ट आहे. प्रेमाची काही व्याख्या नसते, ते काही कुठे शिकवता येत नाही. नटाला जसा अभिनय शिकवता येत नाही, तो शिकावा लागतो. प्रेम तर त्यापुढची गोष्ट आहे, प्रेम हे शिकताही येत नाही, ते करायचं असतं, ते सहज होतं. प्रेम करायला जसा वेळ लागू शकतो तसंच ते विसरायलाही वेळ लागू शकतो. या मूलभूत गोष्टींचा विचार करत प्रेमाविषयी भाष्य करणारं हे नाटक असल्याचं मकरंद यांनी सांगितलं. मुळात ते पृथ्वी थिएटर आणि त्यांनीच स्थापन केलेल्या अंश थिएटर ग्रुपच्या माध्यमातून गेली तीस वर्षे हिंदी रंगभूमीवर कार्यरत आहेत. मात्र मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता या तिन्ही भूमिकेतून प्रेक्षकांसमोर यावं या विचाराने आपण या नाटकाचा प्रपंच मांडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘आंतरमहाविद्यालयीन रंगभूमीवरून मी आलो. त्यावेळी महाविद्यालयीन स्तरावर गुजराती, हिंदी नाटक करता करता मी पृथ्वी थिएटरशी जोडलो गेलो. पृथ्वी थिएटरमध्ये सक्रिय झाल्यानंतर मी तिथेच हिंदी नाटकं करत राहिलो. तिथे मला देशभरातून आलेले विविध नट भेटायचे. अगदी एनएफडीसीतून आलेले, भोपाळ रंगभूमी, कोलकत्त्याहून आलेले नट भेटले आणि मी त्यांच्याबरोबर ‘अंश थिएटर’ सुरू केलं आणि तिथेच नाटक करत रमलो. आत्तापर्यंत मी तिथे ५४ नाटकं लिहिली, दिग्दर्शित केली, अभिनय केला आणि निर्मितीही केली. त्यानंतर मोजूही शकणार नाही इतक्या संख्येने मी बाहेर  छोटी नाटकं केली. इतक्या मोठय़ा प्रवासानंतर मला असं लक्षात आलं की मी मराठी रंगभूमीवर अभिनय केलेला नाही. यावर्षी मी मराठीत व्यावसायिक रंगभूमीवर नाटक केलं, पण तेही लेखक-दिग्दर्शक म्हणून केलं. आता मला लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही काम करायचं आहे आणि ज्या पद्धतीने मी हिंदी नाटक घेऊन दिल्ली, गुजरात-राजस्थान अगदी देशभर फिरलो. तसं मराठी नाटक घेऊन महाराष्ट्रभर फिरायचं आहे’, असं ते सांगतात.

या नाटकाचा कथाविषय त्यांनी अधिक विस्ताराने समजावून सांगितला. ‘कॉलेज संपल्यावर सर आणि त्यांचा एक विद्यार्थी फणिधर हे दोघंही देशभरातील प्रेमिकांच्या गोष्टीवरचा एक प्रकल्प विद्यापीठासाठी करत आहेत. हे काम सुरू असताना फणिधरच्या मनात दडलेलं सुप्त प्रेम बाहेर उफाळून येतं. आणि त्याच्या प्रेमाची चाहूल लागताच सर अस्वस्थ होतात. एकाचं दुसऱ्याच्या प्रेमात गुंतणं, दुसऱ्याचं तिसऱ्याशी जोडलेलं असणं असा हा प्रेमाचा गुंता सरांना सोडवायचा आहे की तो त्यांनीच निर्माण केलेला आहे.. आणि त्यातून हा गुंता सुटणार कसा? असा सर्वसाधारण विषय आहे. कथा आणि मांडणीच्या बाबतीतला एक वेगळा प्रयोग यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल’, असं मकरंद यांनी सांगितलं. एकाचवेळी आठवणी आणि वास्तवाचा पाठशिवणीचा खेळ यात आहे. शिवाय गोष्ट नाटकात जशी गंभीर होत जाते तसतसं प्रेक्षकांसाठी ती मनोरंजक होत जाते. काहीशा उपरोधिक शैलीतलं हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रंगभूमीवरची त्यांची आजवरची वाटचाल आणि गेले वर्षभर ‘लोकसत्ता’तून ‘नाटकवाला’ या सदरातून त्यांनी उलगडलेला रंगभूमीवरच्या आठवणींचा पट यांची सांगड घालताना मराठी प्रेक्षकांसमोर नव्या भूमिकेतून येणं गरजेचं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ हा एकच उद्देश नाही तर या नाटकाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकही  मला प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करताना पाहू शकतील. ज्यांनी माझी आजवरची नाटकं पाहिली नसतील, त्यांना इथे मी काय काम करतो आहे ते लक्षात येईल आणि मी आजवर जे काही वाचत-अनुभवत आलो आहे, ते नाटय़विचार काही प्रमाणात का होईना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं मला शक्य होईल, या हेतूने ‘सर, प्रेमाचं काय करायचं!’ हा नाटय़प्रयोग रसिकांसमोर सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मकरंद देशपांडे यांच्याबरोबर अजय कांबळे, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, निनाद लिमये, अनिकेत भोईर हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.