आपल्या लेखणीतून, दिग्दर्शनातून आणि अभिनयातून रंगभूमीवर सतत प्रयोग करत रसिक प्रेक्षकांना नवे काही देण्यासाठी धडपडणाऱ्या मकरंद देशपांडे यांचे ‘एपिक गडबड’ हे लोकप्रिय नाटक पहिल्यांदाच व्यावसायिक मराठी रंगभूमीवर सादर होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी दीनानाथ नाटय़गृहात दुपारी ४ वाजता ‘एपिक गडबड’चा प्रयोग रंगणार असून मकरंद देशपांडे यांचे हे पहिले मराठी व्यावसायिक नाटक आहे.

आत्तापर्यंत या नाटकाने पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून आशुतोष गोवारीकर, मनोज वाजपेयी, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासारख्या नामवंतांपासून ते रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे.

गेली काही वर्ष सातत्याने आजूबाजूला घडणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या घटना, प्रेरित करणारे नवे विचार नाटकांच्या माध्यमातून रंगभूमीवर आणणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी ‘एपिक गडबड’ नाटकातून फार्सचा एक वेगळा प्रयोग रंगवला आहे. शेक्सपिअरच्या नाटकांचा माझ्यावर प्रभाव आहे. याच प्रभावातून आम्ही ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ हे नाटक केलं होतं. लोकांना हे नाटक खूपच आवडलं. खरं तर ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ हे नाटक मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा माझा मानस होता. मात्र एक अभिनेता म्हणून रोजच्या रोज इतकं महत्त्वाचं नाटक करण्याची जबाबदारी येते तेव्हा माझ्या मनाची सहज तयारी होत नाही, असं अभिनयापेक्षा नाटकाच्या लिखाणात मनापासून रमणारा हा अवलिया कलाकार सांगतो.

‘शेक्सपिअरचा म्हातारा’ हे नाटक मराठीत आले नसले तरी ‘एपिक गडबड’ या नाटकात तुम्हाला पुन्हा एकदा शेक्सपिअरची नाटकं, त्याच्या नाटय़विचारांचे सार तुम्हाला लक्षात आल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला.

नाटकातील नायिका आरती हिच्या लग्नाच्या निमित्ताने ही सगळी गडबड उडाली आहे. आरतीच्या लग्नासाठी वर शोधण्यात आला असून तिला ऐतिहासिक पद्धतीने भव्यदिव्य असा विवाह सोहळा हवा आहे. विवाहाच्या संकल्पनेनुसार वर पेशव्यांच्या रूपात येणार आहे. मात्र आरतीच्या लग्नाची संकल्पना रंगवताना शेक्सपिअरच्या नाटकांचा वापर केला आहे. आपल्या नाटकांवर काही प्रयोग होतो आहे हे शेक्सपिअरला कळते आणि माझ्या नाटकांचं हे काय करतायेत, याचा शोध घेण्यासाठी तो प्रत्यक्ष विवाहस्थळी येतो. अर्थातच, शेक्सपिअरला पाहताक्षणी आरती त्याच्या प्रेमात पडते. एकीकडे ही सगळी गडबड आणि दुसरीकडे पेशवा विरुद्ध शेक्सपिअर असा अफलातून गोंधळ निर्माण होतो, असे काहीसे या नाटकाचे कथानक असल्याचे मकरंद देशपांडे यांनी सांगितले. मुळात हे नाटक म्हणजे फार्स आहे मात्र फार्स म्हणजे निव्वळ एकापाठोपाठ एक घडत जाणाऱ्या चुकीच्या घटनांमधून उडणारा गोंधळ यात नाही. तर त्या प्रत्येक प्रसंगातून काहीएक सांगण्याचा प्रयत्न आहे. हा फार्स आहे म्हणून प्रेक्षक हसत हसत नाटय़गृहाबाहेर पडेल पण तो या नाटकातून काही एक निश्चित स्वरूपाचा विचार घेऊन जाईल, अशा पद्धतीने नाटकाचे लेखन केले असल्याची माहितीही देशपांडे यांनी दिली.

या नाटकात अंकित म्हात्रे, निनाद लिमये, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, भरत मोरे, अजय कांबळे आणि तुषार घाडीगांवकर असे सात तरुण नवोदित कलाकार आहेत. या सातहीजणांनी कसून तालमी केल्या आहेत. आणि त्यांनी अप्रतिम काम के ले आहे. या सातही जणांमधील निदान तीन ते चार कलाकार रंगभूमीवर नावारूपाला येतील अशी आपल्याला खात्री असल्याचेही ते म्हणाले. मकरंद देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘एपिक गडबड’ हे नाटक मराठीत अभिनेता-दिग्दर्शक अभिजीत साटम प्रस्तुत करत आहेत.