‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘राम-लीला’ असे अनेक सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट येत आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे. या चित्रपटाचे ‘मलाल’ असे नाव आहे. हा चित्रपट ‘७ जी रेनबो कॉलनी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक करणार असून या चित्रपटातून संजय लीला भन्साळी दोन नव्या चेहऱ्यांची ओळख करुन देणार आहेत.

संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगल आणि अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान ‘मलाल’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘मलाल’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होताच सोशस मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या ट्रेलरमध्ये मुंबईच्या चाळीत राहणारा मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील शर्मिन आणि मिझानची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे.

‘मलाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांनी केले आहे. मंगेश यांनी २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘टिंग्या’ चे दिग्दर्शन केले होते. मंगेश यांना याआधी ‘टिंग्या’ आणि ‘देख इंडियन सर्कस’ ( हिंदी ) ह्या चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पारितोषिके मिळालेली आहेत.

‘मलाल या चित्रपटाची तयारी खूप आधी पासून सुरु होती. पद्मावत चित्रपटादरम्यान वेशभूषा निवडताना शर्मिन मिझानला माझ्याकडे घेऊन आली होती. त्याला पाहून तो एक दिवस मोठा कलाकार होणार’ असे संजय लीला भन्साळी म्हणाले होते. या चित्रपटाद्वारे भन्साळी दोन नव्या चेहऱ्यांची ओळख करुन देणार आहेत.