बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जिच्याकडे पाहिले जाते, त्या दीपिका पदुकोणला तिचा पहिला सिनेमा कसा मिळाला हे अनेकांना माहिती नसेल. सिनेसृष्टीतील नसल्यामुळे या प्रवासात तिला अनेक चढ- उतारांचा सामना करावा लागला. पहिल्या चित्रपटानंतर तिला अभियनच येत नाही, अशी टीकाही अनेकांनी केली होती. मात्र, अनेकांना माहिती नसेल की,  बॉलिवूडच्या मुन्नीने अर्थात मलायका अरोराने तिला पहिलावहिला ब्रेक मिळवून दिला होता.

एकीकडे बॉलिवूडच्या सुपरस्टार शाहरुख खानसोबत काम करायला मिळावे, अशी अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. पण दीपिकासारख्या नवख्या मुलीला ही संधी मिळाली याचे सुरूवातीला अनेकांना आश्चर्य वाटले होते. ‘ओम शांती ओम’ या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली होती. मलायका अरोरा आणि फॅशन डिझायनर वेनडेल रॉड्रीक्स यांच्या मदतीने तिला हा सिनेमा मिळाला असल्याचे म्हटले जाते.
एले मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या सिनेमात शाहरुखसोबत एक नवा चेहरा असावा अशी दिग्दर्शक फराह खानची इच्छा होती.

याबद्दल तिने मलायकालाही माहिती दिली होती. तसेच मलायकावर अशी मुलगी शोधण्याची जबाबदारीही तिने सोपवली होती. यासाठी मलायकाला फॅशन डिझायनर वेनडेल रॉड्रीक्सनेही मदत केली होती. वेनडेलसाठी तेव्हा दीपिका मॉडेलिंग करत होती. दीपिकाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे वेनडेलला वाटले आणि त्याने फराहला दीपिकाचे नाव सुचवले. मलायकानेही वेनडेलच्या एका फॅशन शोमध्ये तिला पाहिले होते.

याबद्दल बोलताना रॉड्रीक्स म्हणाला की, ‘एका लॅक्मे फॅशन वीकमध्ये दीपिकाने माझ्यासाठी रॅम्प वॉक केला होता. तो रॅम्प वॉक तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. फराहने मलायकाला नवीन अभिनेत्री शोधण्यासाठी सांगितले होते. तेव्हा मलायकाने मला ही गोष्ट सांगितली आणि मी दीपिकाचे नाव सुचवले. तेव्हा मॉडेलिंगमध्ये येऊन दीपिकाला दोन वर्षे ही झाली नव्हती.’

‘मी दीपिकाला त्या शोची सुरुवात करायला सांगितली होती आणि मलायकाला तिला पाहण्यासाठी सांगितले होते. मलायकालाही ती आवडली आणि दीपिकाचे नाव फराहपर्यंत गेले. त्यानंतर तिची रितसर स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि पुढे जे घडले ते तर साऱ्यांनाच माहिती आहे.’ मलायका आणि रॉड्रीक्समुळे बॉलिवूडला एक हरहुन्नरी अभिनेत्री मिळाली त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत.