अभिनेत्री मलायका आरोरा आणि अर्जून कपूर यांच्यातील नात्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान आणि मलायकाचे नाते घटस्फोटापर्यंत पोहचण्यास अर्जुनच जबाबदार असल्याचं मानण्यात येतं. असं असलं तरी देखील अर्जुन आणि मलायका अनेक वेळा एकत्र दिसून येतात. ‘लॅक्मे फॅशन वीक २०१८’ मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. त्यानंतर आता नुकतीच ती अर्जुन कपूरच्या कुटुंबियांसोबत डिनरला गेल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. जुहू येथील सोहो हाऊस येथे हे सगळे एकत्र आले होते.

यावेळी मलायका अरोराने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाचा लेदरचा मिनी स्कर्ट घातला होता. यामध्ये ती अतिशय देखणी दिसत होती. यामध्ये आणखी एका गोष्टीने भर घातली होती. ते म्हणजे या पेहरावावर तिने लाल रंगांचे बूट घातले होते. हिल्स असलेले हे बूट सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते. आता बूटांची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे बूट थोड्याथोडक्या किमतीचे नव्हते तर त्याची किंमत आहे ९०,१८१ रुपये. त्यामुळे इतके महागडे बूट घालून ती अर्जुन कपूरसोबत डिनर डेटला गेली या चर्चांना उधाण आले आहे. मलायका आणि अर्जुन या दोघांनीही कधीच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अर्जुन माझा केवळ चांगला मित्र आहे असं मलायका एका मुलाखतीत म्हणाली होती. पण मलायका आणि अर्जुनला पुन्हा एकदा एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याविषयी कलाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे.