रेश्मा राईकवार

मलाल

दाक्षिणात्य चित्रपटांचा शब्दश: हिंदी रिमेक हा खरेच गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. एकतर तिथे यशस्वी झालेले चित्रपट पूर्णपणे हिंदीत व्यावसायिक पद्धतीने आणि आपल्या शैलीत हाताळण्याची हातोटी दिग्दर्शकाकडे असायला हवी. तो त्याच साच्यात बसवायचा असेल तरी मुळात दिग्दर्शकाला ती कथा का सांगायची आहे, याबद्दलची तरी स्पष्टता हवी. किंवा चांगले यशस्वी कलाकार, हिट गाणी, अ‍ॅक्शन असा फॉम्र्युला तरी जमायला हवा. दिग्दर्शक मंगेश हाडवळे हे फॉर्म्युलाबाज चित्रपट दिग्दर्शकांच्या यादीत मोडतच नाहीत. त्यांचा ‘टिंग्या’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळे हिंदीत ‘मलाल’सारखा चित्रपट ते दिग्दर्शित करणार म्हणजे त्यांच्याकडून वास्तववादी शैलीतील काहीतरी वेगळा चित्रपट अनुभवायला मिळणार हीच अपेक्षा असते. मात्र ‘मलाल’ सगळ्याच पातळ्यांवर निराशा करतो.

मुळात ‘मलाल’ची कथा ही अगदीच नवीन आहे, असे नाही. वाईट, टपोरी मुलगा आणि त्याला सुधारणारी चांगली मुलगी ही अशी प्रेमकथा कित्येक चित्रपटांमधून आपण अनुभवली आहे. त्यामुळे या पातळीवर तरी त्यात नावीन्य नाही. पण यात प्रेमकथा पुढे जात असताना त्यातील व्यक्तिरेखांचा स्वभाव, त्यांचे विचार आणि बदलत्या काळानुसार आयुष्य जगण्याबद्दलचे संदर्भ यात महत्त्वाचे ठरतात. काहीच न करणारा, स्थानिक राजकारण्याचा कार्यकर्ता म्हणून मिरवणारा शिवा मोरे (मिझान जाफरी) आणि एकेकाळी श्रीमंत असलेली पण व्यवसायात आर्थिक फटका बसला म्हणून चाळीत राहायला आलेली आस्था त्रिपाठी (शर्मिन सेगल) यांची प्रेमकथा चित्रपटात पाहायला मिळते. दोन विविध सामाजिक स्तरातून आलेल्या या व्यक्तिरेखा. त्यामुळे सुरुवातीला दोघांचेही एक मेकांशी न पटणे, त्यातही चित्रपटाची कथा १९९८च्या आसपासची असल्याने त्याला उगाचच मराठी-बिहारी वादाची फोडणी देण्याचाही प्रयत्न झाला आहे. कारण हा विषय अक्षरश: चित्रपटातही फोडणीपुरताच येतो. पण नायिकेच्या एकाच शिकवणुकीत नायक तुम्ही बाहेरचे आहात इथपासून आपण सगळे भारतीय आहोत, यावर येतो. अर्थात, त्याच्या या बदलाला प्रेम ही एकच गोष्ट कारणीभूत असते. शिवा टपोरी असला तरी तो हुशार आहे, हे आस्थाच्या लक्षात आल्यानंतर त्याला ट्रॅकवर आणायचे आस्थाचे प्रयत्न सुरू होतात. शिवाला आपल्या प्रेमाची चाहूल लागू न देता त्याला सरळ करण्याच्या प्रयत्नातच मध्यंतरानंतपर्यंतचा भागही खर्ची पडला आहे. अखेर आपल्या हुशार, सुंदर मुलीला शिवाशी विवाह करण्याचा मूर्खपणा करू द्यायचा नाही, या विचाराने पेटून उठलेले आस्थाचे आईवडील या प्रेमकथेच्या आड येतात. पुढे या दोघांच्या प्रेमाची शोकांतिका होते की सुखांतिका हे पडद्यावर पाहणेच इष्ट ठरेल.

चित्रपटाचे शीर्षक ‘मलाल’ हे खरेतर कथेसाठी योग्य, सूचक असे आहे. पण त्यातली सूचकता कथेतही जाणवायला होती. जी मूळ तमिळ चित्रपट ‘७ जी रेनबो कॉलनी’च्या कथेत होती. तमिळमधून हिंदीत चित्रपट करताना कथेतील महत्त्वाचे संदर्भच बदलले गेले आहे. हिंदीत तसेही प्रेमकथेतील दु:ख पचवणे अंमळ जड जाते. त्यामुळे ते सुखावह आणि तितकेच सुलभ करण्याकडे कल जास्त असतो, तसाच प्रयत्न इथेही झाला असल्याने मूळ कथानकातील जो घटनाक्रम आहे, त्यातील तीव्रताच कमी होते. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे निर्मितीमूल्य उत्तम असले तरी भन्साळींच्या प्रेमकथांना निदान भव्यदिव्यतेचा काही आधार असतो जो ‘मलाल’मध्ये चाळीत कथा घडत असल्याने घेता आलेला नाही. चित्रपटाला भन्साळींनी संगीत दिले असले आणि गाण्यांचे बोल नेहमीपेक्षा वेगळे असले तरी फारशी श्रवणीय नसलेली गाणी, एखाददुसरा नृत्याचा प्रसंग या आधारावर चित्रपट पुढे सरकतो. या चित्रपटातून अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान आणि भन्साळी यांची पुतणी शर्मिन यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या दोघांनी आधी भन्साळींकडे साहाय्यक म्हणून काम केले आहे, त्यामुळे पडद्यावरच्या त्यांच्या वावरात अवघडलेपण नाही. पण चाळीतले कथानक आणि शिवाचे मराठी असणे यामुळे संवादातून ते मराठीपण जाणवून देण्याचा तोकडा प्रयत्न करण्यात आला आहे. मिझानचा हेलही मराठी नाही, त्यामुळे हे वरवर आणलेले मराठीपणच जाणवत राहते. त्याने फारसा फरक पडला नसताही कदाचित, जर या दोघांनीही अप्रतिम अभिनय केला असता.. काही मोजक्याच प्रसंगांमधून एकमेकांमधील नजरानजर, हळूहळू फुलत जाणारे प्रेम या गोष्टी दोघांनी छान रंगवल्या आहेत. पण त्यांची केमिस्ट्री त्या अर्थाने प्रेमात पाडत नाही. शिवाची आई झालेल्या अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि वडिलांच्या भूमिकेतील अनिल गवस जास्त लक्षात राहतात. एक सुंदर कथा असतानाही सपक मांडणीमुळे ‘मलाल’ चित्रपटातील प्रेम काही रंगता रंगत नाही. काही मोजके प्रसंग दिग्दर्शक म्हणून हाडवळे यांची शैली, त्यांचे कौशल्य जाणवून देतात.

* दिग्दर्शक – मंगेश हाडवळे

* कलाकार – मिझान जाफरी, शर्मिन सेगल, चिन्मयी सुमीत, अनिल गवस, समीर धर्माधिकारी.