काही महत्त्वाच्या विषयांना हाताळत बॉलिवूड चित्रपटाच्या कक्षाही आता रुंदावत आहेत. या ट्रेण्डमध्ये मोलाचं योदगान देणारा खिलाडी कुमार काही दिवसांतच आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मासिक पाळी, त्या दिवसांमध्ये घ्यायची काळजी या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. अशा या चित्रपटाविषयी नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईसुद्धा आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. ‘द ऑक्सफर्ड युनियन’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात स्थान मिळालेला ‘पॅडमॅन’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या निमित्ताने चित्रपट निर्माती ट्विंकल खन्ना हिने हजेरी लावली होती.

‘पॅडमॅन’विषयी यावेळी ट्विंकलने मोकळेपणाने चर्चा करत मासिक पाळीच्या मुद्द्यावरच चित्रपट साकारण्याचा निर्णय का घेतला, यावरुनही पडदा उचलला. ‘महिला आणि समाजात मासिक पाळीविषयी असलेला न्यूनगंड आणि त्याविषयीच्या गैरसमजुती दूर करण्यासाठीच हा चित्रपट साकारण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली’, असं तिने स्पष्ट केलं.

‘हा चित्रपट (पॅडमॅन) पाहण्यासाठी मी खुपच उत्सुक आहे. कारण, चित्रपटातून एक प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचणार आहे’, असं मलालाने ट्विंकलला या चर्चासत्रास सुरुवात होण्यापूर्वी सांगितलं. या चर्चासत्रात आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल ट्विंकलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘द ऑक्सफर्ड युनियन’चे आभार मानले.

अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण, आता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून, ९ फेब्रुवारीला हा महत्त्वाकांक्षी ‘पॅडमॅन’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.