रेश्मा राईकवार

प्रेमपटांचा बादशाह अशी दिग्दर्शक मोहित सुरीची ओळख आहे. खरेतर, ती त्यानेच आजवरच्या त्याच्या चित्रपटांमधून निर्माण केली आहे. त्याच्या प्रेमकथा या कधीच सहज सुखांतिका नसतात. त्याच्या व्यक्तिरेखाही तितक्या सहजसोप्या नसतात. त्यामुळे गुंतागुंतीचे स्वभाव असलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या आपापल्या भूत-भविष्यासह वर्तमानात जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात नकळत विणले जाणारे प्रेमाचे नाते हा मोहितच्या चित्रपटांचा विषय असतो. ‘मलंग’मध्येही पुन्हा हेच प्रेमाचे सूत्र घेऊन कथा गुंफण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. मात्र या वेळी अ‍ॅक्शन आणि रहस्यभेदाची मात्रा यात जास्त आहे. त्यामुळे मस्तमौला प्रेमाची कथा यात असली तरी तो मोहित सुरीचा चित्रपट आहे हे पचवणे अंमळ जड जाते.

दिग्दर्शक कथा आणि त्याच्या मांडणीच्या शैलीत नेहमीच प्रयोग करत असतात, ते त्यांनी केलेच पाहिजे. पण हे करत असताना मुळात आपण प्रेक्षकांना काय कथा सांगतो आहोत, कोणाच्या माध्यमातून सांगतो आहोत, याबद्दल दिग्दर्शकाच्या मनातच गोंधळ उडाला असेल तर चित्रपटातही तो ठळकपणे जाणवतो. इथेही तोच प्रकार घडला आहे. ‘मलंग’मध्ये ढोबळमानाने अद्वैत ठाकूर (आदित्य रॉय कपूर) आणि सारा (दिशा पटानी) ही मुख्य जोडी आहे, असे म्हटले तरी इथे मुळात तीन नायक आहेत. आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू. या तिघांच्याही व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने सतत हलत्या ठेवल्या आहेत. म्हणजे रूढार्थाने यांच्यापैकी कोणीही एक नायक नाही आणि खलनायकही नाही. हा संदिग्धपणा का हे कळण्यासाठी जवळपास दोन तासांचा चित्रपट पाहावा लागतो. आपल्या आयुष्यात साहस नाही, आपले आईवडील आहे तसे आयुष्य जगत आले, पण त्यांनी ते कधी खऱ्या अर्थाने उपभोगलेलेच नाही, असा काहीसा (गैर)समज घेऊन सगळे सोडून पॅरिसवरून गोवा गाठणारी सारा आणि आईवडिलांच्या विभक्तपणामुळे त्यांच्यापासून दूर पळणारा आदित्य दोघेही गोव्यात भेटतात. आयुष्यात काही न ठरवता आहे ते क्षण आनंदात घालवायचे असा काहीसा विचार करून गोव्यात वावरत असताना हे दोघेही एकत्र भेटतात आणि पुढचा प्रवासही सुरू करतात. एका क्षणी आपण जे काही करतो आहोत त्यातली निर्थकता त्यांच्या लक्षात येते, त्यांच्यात फुलत गेलेल्या आणि घट्ट झालेल्या प्रेमबंधातून दोघेही एकत्रित नवे आयुष्य सुरू करण्याच्या निर्णयाप्रत येतात आणि इथेच नेमका घात होतो. इथून पुढे सुरू होते ती बदला, हत्या आणि पाठलागाची एकच मालिका. यातही इतक्यावेळा कथेला आणि व्यक्तिरेखांनाही इतके वेगळे वळण लागते की सुरुवात कुठून झाली होती हेही आकळू नये..

‘मलंग’च्या बाबतीत वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे, मात्र ते कशा पद्धतीने ठसवायला हवा आणि जर इथे या कथेचा नायक म्हणून आणखी क ोणी दिग्दर्शकाला उभे करायचेच होते तर आदित्य, अनिल आणि कुणाल या तिघातिघांची गरजच नव्हती. अर्थात, या तिघांमुळेच चित्रपट पडण्यापासून वाचला आहे हेही सांगायला हवे. साराची व्यक्तिरेखा चित्रपटात मुख्य आहे, मुक्तपणे जगू पाहणारी सारा मोबाइल, समाजमाध्यमांपासूनही दूर आहे. ती वेगळी आहे असे म्हणायला जावे तर तिचा वेगळेपणा हा फक्त गोव्यातील रेव्ह पाटर्य़ामध्ये नशेचे वेगवेगळे प्रकार करून पाहतानाच दिसतो. त्यातल्या त्यात उंचीची असलेली भीती घालवण्यासाठीचे तिचे प्रयत्न, आईवडिलांचे नाते आठवत समजून घेण्याचा प्रयत्न या गोष्टीही सारामध्ये आहेत. मात्र पडद्यावर हे सगळे साराच्या चेहऱ्यावर दिसतच नाही. दिशा पटानी नामक अभिनेत्रीने आपल्या दिसण्यावर खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे तिच्या तथाकथित बोल्ड दृश्यांमधून ती दिसतेही. पण नायकाला पहिल्यांदा चुंबन देण्यात पुढाकार घेतानाही तिचा चेहरा तितकाच सरळ दिसतो, नायक मार खातानाही ती त्याच सरळ नजरेने वाचवा वाचवा ओरडते. प्रेमात, रागात.. घटना कुठलीही असो, तिच्या तोंडचे संवादही एका सरळ रेषेतच बाहेर पडतात. कुणाल खेमूला इतक्या काळानंतर ‘गोलमाल’ विनोदातून बाहेर पडून एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची पर्वणी हा चित्रपट देतो. त्यातही कुणालची टक्कर थेट अनिल कपूर यांच्याशी आहे, मात्र त्याने सहजपणे आपल्या शैलीत मायकेल रॉड्रिग्ज नामक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अनिल कपूर इथे आगाशे नामक पोलिसाच्या भूमिकेत आहे आणि हा आगाशे खूप भाव खाऊन जातो. एकाच वेळी चकमकफेम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आगाशेचाही एक भूतकाळ आहे आणि त्यात तो एक प्रेमळ पिता म्हणूनही आपल्यासमोर येतो. नशा करून कर्तव्यावर असणारा पण खुन्याचा माग काढताना डोके शाबूत ठेवणाऱ्या आगाशेच्या वेगवेगळ्या छटा अनिल कपूर यांनी सहजी रंगवल्या आहेत. मोहितचा लाडका प्रेमवीर आदित्य रॉय कपूरने त्याला याही चित्रपटात निराश केलेले नाही. एकीकडे सडपातळ बांध्याचा, लाजराबुजरा अद्वैत आणि दुसरीकडे सुडाच्या भावनेने पेटलेला, पिळदार शरीरयष्टीचा अद्वैत हा फरक त्याने उत्तम उभा केला आहे. या तिघांबरोबरच वत्सल शेठ, प्रसाद जवादे आणि कीथ सिक्वेरा यांनीही आपापल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अमृता खानविलकर छोटेखानी भूमिकेतही लक्षात राहते आणि दुय्यम भूमिकेत असूनही दिशा पटानीपेक्षा एली अवाराम जास्त लक्षात राहते. एकंदरीतच दिग्दर्शक म्हणून मोहित सुरीने त्याच्या शैलीच्या बाहेर जाऊन केलेला हा प्रयोग काही भागांत जमला असला तरी बराचसा ‘मलंग’पणे भरकटला आहे.

‘मलंग’

दिग्दर्शक- मोहित सुरी, कलाकार- आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू, दिशा पटानी, कीथ सिक्वेरा, एली अवाराम, प्रसाद जवादे, अमृता खानविलकर.