सहसा कलाकार त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. पण, मल्ल्याळम अभिनेता दिलीप गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका प्रसिद्ध मल्ल्याळम अभिनेत्रीचे अपहरण करुन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिलीपला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. के. राजकुमार या वकिलांमार्फत दिलीपने जामिन मिळण्यासाठीचा अर्ज केलाचंही वृत्त आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला तीन दिवसांच्या कोठडी व्हावी अशी मागणी केल्याचं कळतं.

पुरावे आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी केलेल्या या मागणीची दखल घेत दिलीपला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. या सर्व प्रकरणी आपण निर्दोष असल्याचं म्हणत कोणीतरी आपल्याविरोधात हा डाव रचल्याचं दिलीपचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलीस अहवालातील माहितीनुसार दिलीपवर १० कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बलात्कार, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे असे गुन्हे त्याच्या नावे दाखल करण्यात आले आहेत. कलम १२० (ब) अंतर्गत कट रचण्याचा गुन्हा सिद्ध झाला तर, दिलीपला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता तपासप्रक्रियेला गती आल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

मंगळवारी दिलीपला अटक झाल्यानंतर ‘एएएमए’ आणि ‘एफइएफकेए’ या कलाकार संस्थांअंतर्गत त्याला काही कलाकारांनी पाठिंबा दिला होता. पण, आता मात्र त्यांनी यातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अहवालानुसार जवळपास वर्षभरापूर्वी हा सर्व कट रचण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात सुपारी गँग विरोधात अभिनेत्रीवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आता या सर्व प्रकरणामध्ये पुढे काय उलगडा होणार याकडे अनेकांचच लक्ष लागून राहिलं आहे.