मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंगाच्या प्रकरणानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीमध्ये महिलेंवर होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल खंत व्यक्त केली आहे. अभिनेत्रीवर ओढावलेल्या प्रसंगानंतर वरलक्ष्मी सरथकुमारने चित्रपटसृष्टीत तिच्यासोबत कार्यालयामध्ये घडलेल्या लैंगिक शोषणाचा प्रसंग फेसबुकच्या माध्यमातून सांगितला आहे. तिच्यावर झालेल्या अन्यायावर खुलेपणाने लिहिताना तिने समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे दाखवून दिले. लैंगिक अत्याचारावर व्यक्त होताना वरलक्ष्मी लिहिते की, “एका लोकप्रिय वाहिनीमध्ये प्रोग्रॅमिंगची मुख्य जबाबदारी स्वीकारताना कार्यालयीन मिटींगमध्ये मला एक भयानक अनुभव आला. अर्ध्या तासाची मिटींग संपल्यानंतर पुरुष सहकाऱ्याने बाहेर कधी भेटायचे असे विचारले. त्याच्या या प्रश्नावर प्रतिउत्तर देताना काही विशेष कामानिमित्त का? असा प्रतिप्रश्न मी केला. यावर हसत मुखाने त्या व्यक्तिने मला कामाविषयी नाही तर काही वेगळा विचार करण्याविषयी सांगितले. त्याच्या या उत्तरानंतर मला खूप राग आला होता. माफ करा असे सांगत मी त्याला तिथून जायला सांगितले. तो मनुष्य असे वागून देखील हसत मुखाने बाहेर गेला.”

ती पुढे लिहिते की, लोकांची याबाबतची प्रतिक्रिया ही अगदी सामान्य असते. चित्रपटसृष्टीमधील आणि चित्रपटसृष्टीबाहेरील लोक या क्षेत्रात असेच होणार असे मानतात. तुम्हाला माहिती असते मग या क्षेत्राकडे तुम्ही वळताच कशाला असा प्रश्न देखील अनेकजण करतात. एवढेच नाही तर तक्रार करण्यात काय अर्थ आहे? असा सूर देखील पाहायला मिळतो. समाजातील संकुचित विचारांवर तिने खंत व्यक्त केली. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला सांभाळून पुढे चालविण्यासाठी मी या क्षेत्रात आलेली नाही, तर मला अभिनयावर प्रेम असल्यामुळे मी हे क्षेत्र निवडले आहे असेही ती म्हणते. मी माझ्या कामाबद्दल प्रामाणिक आहे. मी अशा घटनांमुळे माघार घेणार नाही. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विचार व्यक्त करताना महिलांची सुरक्षा हे एक स्वप्न आहे. त्यामुळेच बलात्कार या शब्दाचे समाजातून उच्चाटन होऊ  शकलेले नाही, असा उल्लेख  तिने पोस्टमध्ये केला आहे.

वरलक्ष्मीच्या चित्रपटाविषयी सांगायचे तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्माता बाला पाजनीसामी यांच्या आगामी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये ती करकट्टम नर्तकीच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिने खास नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. वरलक्ष्मीने २०१२ मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीमधून पदार्पण केले होते.

यापूर्वी मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग केल्याची घटना ही दुर्देवी असल्याचे मत मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने व्यक्त केले होते. या प्रकारानंतर या अभिनेत्याने महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या घटनेमुळे पुरुष असल्याने मान खाली झुकली असल्याचेही तो म्हणाला होता. केरळमधील अभिनेत्रीवरील ओढावलेल्या प्रसंगामुळे चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचाही मुद्दा आता समोर येत आहे.