मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग केल्याची घटना ही दुर्देवी असल्याचे मत मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने व्यक्त केले आहे. या घटनेमुळे केरळमधील महिला सुरक्षित नसल्याचा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. या घटनेमुळे पुरुष असल्याने मान खाली झुकली असल्याचे त्याने म्हटले आहे. पृथ्वीराजने सहकारी अभिनेत्रीवरील दुर्देवी घटनेवरील भावना फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सकाळी डोळे उघडताच या अभिनेत्री भावनाच्या वृत्तामुळे मला अस्वस्थ केले, असे त्याने म्हटले आहे. या घटनेमुळे पुरुष असल्याची शरम वाटत असल्याचे सांगत माझी मान शरमेने खाली झुकली आहे, असा उल्लेख पृथ्वीराजने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच संबंधित आरोपींची कसून चौकशी करावी, अशी मागणी देखील पृथ्वीराजने केली आहे. तिच्यासोबत आठवड्या भरापूर्वीच चित्रीकरणाला सुरुवात केली होती. मात्र तिने सध्या कॅमेऱ्यासमोर न येण्याचा निर्णय घेतला आहे. मी तिची अवस्था समजू शकतो, असे सांगत पृथ्वीराजने अभिनेत्रीच्या धैर्याचे कौतुक केले.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी  एकाला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आपलं अपहरण करुन विनयभंग केल्याचा आरोप मल्याळम अभिनेत्री भावनाने केला होता.  मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री भावना हिचे कोची येथे अपहरण करण्यात आले होते. भावना शुक्रवारी रात्री तिच्या गाडीतून कोचीहून थ्रिसर येथे जात असताना टेम्पोमध्ये बसलेल्या काही व्यक्तिंनी तिचा पाठलाग केला. अथनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सदर टेम्पोने भावनाच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर भांडणाच्या निमित्ताने या टोळीने गाडीचा ड्रायव्हर मार्टिन याला आत ढकलले. अज्ञात व्यक्तिंनी भावनाचे अपहरण करून जवळपास दीड तास तिला गाडीत डांबून ठेवले होते. यावेळी त्यांनी तिचे काही फोटो आणि व्हिडिओदेखील काढण्यात आले. त्यानंतर या टोळीने तिला पलरीवट्टम जंक्शन येथे सोडून तेथून पलायन केले. सदर घटनेनंतर भावनाने तिच्या घराजवळ राहत असलेल्या निर्मात्याचा घरी आसरा घेतला. सर्व प्रकार तिने निर्मात्याला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.