X

…म्हणून प्रिया वरियरला घरच्यांनी हॉस्टेलला पाठवले

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी

एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. व्हॅलेंटाइन्स वीकच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमधील तिच्या हावभावांचे लाखो तरुण दिवाने झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे तिला एका दिवसात सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर फॉलो केले गेले. जगभरात कमी वेळात सर्वात जास्त इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमध्ये प्रिया तिसऱ्या स्थानावर आहे. प्रियाला मिळत असलेल्या या प्रसिद्धीचा तिच्या कुटुंबियांना फार त्रास होत आहे. अखेर प्रियाच्या आईने जगभरातून प्रियाला मिळत असलेल्या प्रसिद्धीवर आपले मत मांडले आहे.

‘द न्यूजमिनिट डॉट कॉम’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रियाची आई प्रीथा म्हणाल्या की, सध्या प्रियाला या सर्व प्रसिद्धीपासून दूर हॉस्टेलमध्ये ठेवले आहे. अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा आम्हा सर्वांनाच त्रास होत आहे. तसेच सिनेमाच्या दिग्दर्शकांनी प्रियाला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कोणतीही मुलाखत देण्यास मनाई केली आहे. सिनेमाची फारच कमी दृश्य चित्रीत करण्यात आली असून सिनेमाचे चित्रीकरण अजूनही सुरू आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गोंधळापासून प्रियाला लांब ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

‘प्रियाची अभिनयातील आवड पाहता आम्ही तिला एका सिनेमाच्या ऑडिशनला घेऊन गेलो. पहिल्यांदा आम्ही प्रियाला ऑडिशनला घेऊन गेलो तेव्हा ती १२ वीत होती. त्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली होती, पण बोर्डाच्या परीक्षांमुळे ती चित्रीकरणाला जाऊ शकली नाही. त्यानंतर दिग्दर्शकांनी स्वतःहून त्यांच्या आगामी सिनेमाच्या ऑडिशनबद्दल सांगितले.’ असे प्रियाच्या आईने सांगितले.

एकाच दिवसात प्रियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. इन्स्टाग्रामवर एका दिवसात एवढे फॉलोवर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी झाली आहे. पण प्रिया कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर नसल्याचे तिच्या आईने स्पष्ट केले. प्रीथा म्हणाल्या की, ‘१८ वर्षीय प्रियाने आतापर्यंत फक्त एक रँप शो आणि एक फोटोशूट केले आहे. फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरनेही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आम्ही त्यांच्याकडून ते फोटो घेतलेही नाही.’