१६ व्या दशकातील कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या रचनांवर ‘पद्मावत’ हा सिनेमा बेतला आहे. एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असताना मलेशियामध्ये मात्र या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात करणी सेनेने सिनेमाला कडाडून विरोध केला होता. तरीही ‘पद्मावत’ सिनेमा भारतात प्रदर्शित झाला आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला. मात्र आता मलेशियाच्या नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डाने (एलपीएफ) सिनेमाचे प्रदर्शन रोखून धरले आहे.

‘वेरायटी डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एलपीएफचे अध्यक्ष मोहम्मद जामबेरी अब्दुल अजीज म्हणाले की, मलेशियामध्ये मुस्लिम वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली कथा मुस्लिमांसाठी संवेदनशील ठरू शकते. हा धोका लक्षात घेता मलेशियात हा सिनेमा तुर्तास तरी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पद्मावत’ या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहीद कपूर, रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

वाद आणि विरोधाचं सावट असतानाही ‘पद्मावत’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सोमवारीच या सिनेमाच्या खात्यात १५ कोटींची कमाई झाली होती. त्यानंतर बुधवारी या सिनेमाने १२. ५ कोटींची लक्षवेधी कमाई केली असून, आता हा आकडा १५५.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘पद्मावत’ची घोडदौड अशीच सुरु राहिली तर येत्या काळात हा सिनेमाही अनेक विक्रम रचू शकतो आणि काही विक्रम मोडित काढू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. Boxofficeindia.com च्या माहितीनुसार भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कामगिरी पाहता येत्या काळात ‘पद्मावत’ २०० कोटींच्या आकडा सहज पार करेल.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणताच मोठा सिनेमा प्रदर्शित होत नसल्यामुळे त्याचाही फायदा ‘पद्मावत’ला होणार हे नाकारता येणार नाही. तेव्हा आता येत्या काळात भव्यता आणि कल्पनाशक्तीच्या परिसीमा ओलांडणाऱ्या या सिनेमाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असणार यात शंका नाही.