भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणारा मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या बहुचर्चित ‘इंडिया गोल्ड’ विभागातील चित्रपटांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यंदा या विभागात भारताच्या विविध भागांत तयार करण्यात आलेल्या दहा दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जगभरातल्या चित्रपट उद्योग क्षेत्रातील मान्यवर कलाकार ‘इंडिया गोल्ड’ विभागातील चित्रपटांचे परीक्षक ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. २१ वा जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिवल १७ ते २४ ऑक्टोबरदरम्यान संपन्न होणार आहे.

यंदाच्या दहा चित्रपटांतून भारतातील बहुविधतेचे सेल्युलॉइड दर्शन ही प्रेक्षकांसाठी अनोखी मेजवानी ठरणार आहे. पहाडी, मैथिली, आसामी, नेपाळी, हिंदोस्थानी आणि बंगाली या भाषांनी यंदाच्या यादीत स्थान मिळवले आहे. २०१५ मध्ये कोथानोडी या चित्रपटाद्वारे मामी फेस्टिवलमध्ये स्थान मिळवलेल्या भास्कर हजारिका यांनी त्यांच्या आमीस या चित्रपटाद्वारे यंदा पुनरागमन केले आहे. या चित्रपटाचा आशिया विभागाचा प्रीमियर मामी महोत्सवादरम्यान होईल. २००९ मध्ये सागर सेतू या लघुपटासाठी सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळवणाऱ्या अर्चना अतुल फडके यांचा अबाऊट लव्ह हा मराठी माहितीपटही यंदा मामीत दमदार एंट्री करणार आहे.

पुष्पेंद्र सिंग यांचा मरू रो मोती (वाळवंटातले मोती), अचल मिश्रा यांचा गमक घर आणि सौरव राय यांचा निमतोह (निमंत्रण) हे तीन चित्रपट गोल्ड विभागात जागतिक स्तरावर प्रदर्शित होतील. गीतांजली राव यांचा बॉम्बे रोज आणि किश्ले यांचा ऐसे ही या चित्रपटांसह सहा चित्रपट मामी फेस्टिवलमधून भारतात प्रदर्शित होणार आहेत.