नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफेड्रिन’ पावडरच्या तस्करीप्रकरणी ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयाने ममता कुलकर्णीचे वर्सोवातील तीन फ्लॅट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या तीन घरांची किंमत २० कोटी रुपये इतकी आहे.

‘इफेड्रिन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट ठाणे पोलिसांनी उघड केले होते. दोन हजार कोटी रुपयांच्या या रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी, विकी गोस्वामीचा सहभाग असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एच एम पटवर्धन यांनी बुधवारी ममता कुलकर्णीची तीन घरं जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ममता कुलकर्णींची वर्सोवात एका इमारतीमध्ये तीन घरं आहेत. यातील एक घरं पहिल्या मजल्यावर, दुसरं घर दुसऱ्या मजल्यावर आणि तिसरं घर सातव्या मजल्यावर आहे. या तीन घरांची एकूण किंमत सुमारे २० कोटी रुपये इतकी आहे. फरार आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय होता ममता आणि विकीचा प्लॅन ?
८ जानेवारी २०१६ रोजी इफ्रेडीन प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याने केनियामध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीस एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीचा संचालक मनोज जैन, अभिनेत्री ममता कुलकर्णी, किशोर राठोड, जयमुखी, डॉ. अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार उपस्थित होते. टांझानियामध्ये डॉ. अब्दुला याची सबुरी फार्मा नावाची कंपनी असून तो विकी गोस्वामीचा व्यावसायिक भागीदार आहे. सोलापूरमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीतील इफ्रेडीन पावडरचा साठा सबुरी फार्मा कंपनीमध्ये पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. सबुरी फार्मामध्ये इफ्रेडीनवर प्रक्रिया करून त्यापासून मेथ अ‍ॅम्फाटामाईन (आईस) हा अंमली पदार्थ तयार करण्यात येणार होता आणि त्याची युरोप, अमेरीकासह जगातील विविध देशांमध्ये विक्री करण्याचे बेत आखण्यात आले होते.