‘थेनेमोझी बीए’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेला दाक्षिणात्य अभिनेता सेल्वाराथिनम याची हत्या झाली आहे. चेन्नई पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या फुटेजमध्ये चार जण घटनास्थळी संशयास्पद पद्धतीने हालचाल करताना दिसत आहेत. पोलीस सध्या या चौघांचा शोध घेत आहेत.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकारांची टीका

सेल्वाराथिनमची हत्या शनिवारी (१४ नोव्हेंबर) रात्री करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेल्वाराथिनम मालिकेच्या चित्रीकरणास त्या दिवशी गैरहजर होता. त्या दिवशी त्याने सुट्टी घेऊन संपूर्ण दिवस मित्रमंडळींसोबत मजा मस्ती केली. रात्री घरी परतल्यानंतर त्याला कोणा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीनं अभिनेत्याला घराबाहेर बोलावलं. त्यावेळी त्याचे दोन रुममेट्स त्याच्यासोबत होते. तो त्यांना म्हणाला, माझा एक जुना मित्र भेटायला आला आहे त्याला घेऊन येतो. अन् तो बराच वेळ घरी आला नाही. शेवटी त्याला पाहण्यासाठी त्याचे ते दोन मित्र घराबाहेर पडले तेव्हा त्यांना अभिनेता घराबाहेर मृतअवस्थेत सापडला. त्यांनतर त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला.

अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?

सेल्वाराथिनमचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या महिलेच्या पतीनं एकदा त्याला जीवेमारण्याची धमकी देखील दिली होती. या पार्श्वभूमीवर महिलेच्या पतीनं हत्या केली असेल असा प्राथमिक संशय पोलीस व्यक्त करत आहेत. सेल्वाराथिनम छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता होता. तो मुळचा श्रीलंकन आहे. २००५ साली तो काम मिळवण्यासाठी भारतात आला होता. तेव्हापासून आजतागायत जवळपास एक दशक तो दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत कार्यरत होता. ‘थेनेमोझी बीए’ या मालिकेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारायचा.