करोना व्हायरसमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी लोक विविध प्रकारच्या उपाय योजना करत आहेत. अगदी मास्क लावण्यापासून हँड सॅनिटायजरच्या वापरापर्यंत, सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे अगदी काटेकोरपणे पालन करत आहेत. मात्र या उलट दिल्लीमध्ये एक आवाक् करणारा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती ‘करोना’ असे ओरडून मुलीच्या अंगावर थूंकून पळून गेला.

का थूंकला तो मुलीच्या अंगावर?

हा धक्कादायक प्रकार दिल्लीमधील विजयनगर येथे घडला आहे. या ठिकाणी बाईकवरुन प्रवास करणारा एक व्यक्ती ‘करोना’ असे ओरडून फूटपाथवर चालणाऱ्या एका मुलीच्या अंगावर थूंकला. ही मुलगी मणिपूरची आहे. या मुलीचा फोटो अभिनेता मनिष पॉल याने ट्विट करुन अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाला मनिष पॉल?

“असं मुर्खासारखं वागण थांबवा. करोना विषाणू विरोधात ही एकत्र येण्याची वेळ आहे.” अशा आशयाचे ट्विट मनिष पॉल याने केलं आहे.
सरकार, डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, विविध सामाजिक संस्था करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार स्वच्छतेचे उपदेश करत आहेत. मात्र काही लोक आपल्या चित्रविचित्र कृतीतून या सूचनांचे पालन न करता उलट करोना विषाणूच्या फैलावाला आणखी खत पाणी घालत आहेत. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे दिल्लीत घडलेला हा प्रकार. मनिष पॉलने ट्विट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.