|| पंकज भोसले

साठच्या दशकामध्ये पडद्यावरच्या रांगडय़ा भूमिकांमधून ‘मॅन विथ नो नेम’ म्हणून ओळख पटकावणाऱ्या अभिनेता क्लींट ईस्टवूड याने आपली रांगडेश्वराची प्रतिमा हॉलीवूडच्या एकसाची देमार पटांमधून जाणीवपूर्वक तयार केली. त्यानंतर वैविध्यपूर्ण अशा व्यक्तिप्रधान चित्रपटांची दिग्दर्शन धुरा वाहत त्याने आपल्यातील बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेची चुणूक दाखवली. दरएक दशकातील बदलत्या अ‍ॅक्शन-ड्रामा सिनेमांच्या पठडीशी जुळवून घेत न थकता ईस्टवूडचा चित्रपट येत राहिला आणि ऑस्कर पुरस्कारांवर छाप पाडत राहिला.

व्हिएतनाम युद्धानंतरच्या अमेरिकी वैफल्यग्रस्त मानसिकतेत मानसिक उभारी देणारे ईस्टवूडचे वेस्टर्न चित्रपट नाइन इलेव्हनच्या ऐतिहासिक हल्ल्यानंतरही त्याच उत्साहप्रसाराचे काम करीत राहिले. मिस्टिक रिव्हर (२००३) , मिलियन डॉलर बेबी (२००४) या चित्रपटांनी ऑस्कर गाजविल्यानंतर गेल्या दीड दशकभरामध्ये या अभिनेत्या-दिग्दर्शकाने युद्धपट (फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स, लेटर टू इवो जिमा, अमेरिकन स्नायपर), साहसपट (सली, द फिफ्टीन : सेव्हन्टीन टू पॅरिस, ग्रान टोरिनो) व्यक्तिवेधपट (जे एडगर, जर्सी बॉईज, इन्व्हिक्टस) आणि ‘चेंजलिंग’, ‘हिअरआफ्टर’सारखे ड्रामेबाज चित्रपट बनविले. या चित्रपटांतील विषयवैविध्य पाहिले तर ईस्टवूडचा चित्रपटउत्साह वयाची जराही तमा न बाळगता विस्तारलेलाच पाहायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी आलेला ‘द म्यूल’ हा चित्रपट या अभिनेत्याचा रांगडेपणा त्याच्या जर्जरावस्थेतही अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना देतो.

वयाच्या नव्वदीमध्ये दिग्दर्शकासह नायकपद वठवण्याची ईस्टवूडची हौस ही जगातल्या कोणत्याच चित्रसृष्टीमध्ये न घडलेली आणि भविष्यातही न घडू शकणारी गोष्ट असेल. (आपल्याकडे १९९० साली अव्वल नम्बर सिनेमात देव आनंद यांचा गात्रे क्षीण असताना गाण्यावर नाचणारा अशक्य डीआयजी विक्रम सिंग केवळ ६७ वर्र्षांचा होता.) मुष्टियोद्धा प्रशिक्षकापासून ते कोरियन युद्धात पोळलेल्या सैनिकापर्यंत कोणत्याही भूमिकेत साहस, चातुर्य आणि प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याची खुबी ईस्टवूडच्या कोणत्याही भूमिकेमध्ये दिसते. ‘द म्यूल’ या चित्रपटाचा विषय निवडतानाच त्याने आपल्या शरीरमर्यादांची जाणीव ठेवली असल्याने इथे ९० वर्षांच्या म्हाताऱ्याचे साहस आणि चातुर्यच तेवढे दिसू शकेल. कुणाशी दोन हात करण्याचे सोडा, छप्पन इंची छाती असल्याचा अलीकडच्या सिनेमांपर्यंत असलेला ईस्टवूडचा पारंपरिक अवतार इथे हरविलेला दिसतो.

‘द म्युल’च्या गोष्टीला आधार आहे तो २०१४ साली ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आलेल्या एका गुन्हे रिपोर्ताजचा. लिओ शार्प नावाचा एक ९० वर्षांचा जर्जर वृद्ध अमली पदार्थविरोधी पथकाच्या जाळ्यात एके दिवशी अपघाताने पकडला गेला. चौकशीनंतर लक्षांत आले की पूर्वाश्रमीचा कोरिया युद्धात लढलेला हा अमेरिकी सैनिक फुलशेतीच्या संशोधनात अफाट  नाव कमावलेला असामी आहे. उतारवयात पैशांची निकड म्हणून त्याने ड्रग्ज वाहतूकदाराचे (म्यूल) काम स्वीकारले. वंश, वय आणि स्वच्छ चारित्र्य या बळावर लिओ शार्पने ड्रग्जची विक्रमी वाहतूक काही वर्षांत केली. त्यातून आलेल्या पैशांचा त्याने विधायक कार्यासाठी वापर केला. या गाजलेल्या गुन्हे रिपोर्ताजला ईस्टवूडसाठी ‘द म्यूल’ चित्रपटात परिवर्तित करण्यास सोपे होते. लिओ शार्पचे वय यांतील समानता त्याला चित्रपट आपल्या लयीत बनविण्यासाठी सहजशक्य असल्याने त्याने हा चित्रपट करायचे ठरविले असावे.

‘द म्यूल’ सुरू होतो तो अर्ल स्टोन (ईस्टवूड) या फुलशेतीत रमलेल्या शेतकऱ्यापासून. आपल्या संशोधनापुढे पत्नी, मुलगी आणि नात यांच्यासाठी यातील जराही वेळ न देणाऱ्या अर्ल स्टोन फुलांच्या प्रदर्शनांत पारितोषिके पटकविण्यात आणि तिथल्या जगातल्या मान-सन्मानांत रमलेला असतो. पुढे फुलशेतीतील संशोधनात अव्वल असूनही काळाची गती न ओळखल्याने त्याला आर्थिक कफल्लक अवस्था प्राप्त होते आणि कुटुंबाकडून मानहानीचा फटकारा मिळाल्यानंतर नैराश्य आणि पश्चात्तापाच्या पहिल्या पायरीवर तो येऊन पोहोचतो. या दरम्यान त्याची ड्रग्ज वाहतूक करणाऱ्या टोळीशी अचानक गाठ पडते. सुरुवातीला एकदाच हा प्रकार करायचे ठरवणारा अर्ल स्टोन काही चांगल्या गोष्टी करण्यात आर्थिक अडचण दिसायला लागली की ड्रग्ज वाहून नेण्यासाठी स्वखुशीने हजर होतो. नंतर ते वाहून नेण्याचे व्यसन लागल्यासारखे एकामागून एक फेऱ्या मारण्यास सुरुवात करतो.

या कालावधीत हायवेवरून मेक्सिको सीमामार्गे येणाऱ्या अमली पदार्थाचा बंदोबस्त करण्यासाठी कॉलिन बेट्सचा (ब्रॅडली कुपर) ताफा सज्ज झालेला असतो. हा निष्णात अधिकारी अनेक उचापती करून निर्धोकपणे सुरू असलेल्या ड्रग्ज वाहतुकीचे धागे-धोरे शोधत असतो. मात्र अर्ल स्टोनचे वृद्धत्व आणि चलाख वावर त्याच्या हाती काही सापडू देत नाही.

चित्रपटात ड्रग्ज डिलर्स आणि त्यांच्या वाहतुकीचे ब्रेकिंग बॅडपासून नार्कोस या अमेरिकी मालिकांनी परिचित करून दिलेले जग आहे. चित्रपट बऱ्यापैकी संयत असला, तरी पकडून ठेवणारा आहे. ईस्टवूडच्या वाटेला हाणामारी नाही, मात्र ड्रग्ज वाहतुकीदरम्यान ललनांशी त्याच्या अतिशयोक्तरीत्या वावरण्याचा तपशील त्याच्या परिचित रांगडेपणाच्या खुणा दर्शविण्यासाठी दाखविण्यात आला असावा. पाठीला न झाकणारे पोक आलेला आणि चालता-बोलतानाही जर्जर वाटणारा ‘द म्यूल’मधील क्लींट ईस्टवूड त्याच्या पारंपरिक चाहत्यांना खटकू शकेल. तरीही जगभरात बजेटच्या तिपटीहून अधिक पैसा या चित्रपटाने कमावलेला आहे. ईस्टवूडचा रांगडेपणा पूर्णत: अस्तंगत होण्याआधीचा हा महत्त्वपूर्ण सिनेमा ठरेल, यात शंकाच नाही.