बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमीने चित्रपट निर्माते महेंद्र धारीवाला यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. मंदाना ही तिचा आगमी चित्रपट ‘कोका कोला’चे चित्रीकरण करत होती. दिवाळीच्या दोन दिवसआधी, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाला यांनी सेटवर मानसिक छळ केल्याचा आरोप मंदानाने केला आहे.

नुकतीच मंदानाने बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने महेंद्र धारीवाला यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. ‘कोका कोला या चित्रपटावर आम्ही गेल्या एक वर्षापासून काम करत आहोत. या चित्रपटाची टीम देखील प्रोफेशनल नव्हती हे मला माहित असून देखील मी काम करत होते. सुरुवातीपासूनच मला अनेक समस्या होत्या. निर्माते महेंद्र धारीवाला हे खूप जुन्या विचारांचे आहेत. १३ नोव्हेंबर रोजी जे काही घडले त्याने मला धक्काच बसला’ असे मंदाना म्हणाली.

‘चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी मी पॅकअप करत होते कारण मला आणखी कोणाला तरी भेटायचे होते. त्या दिवशी माझा छोटासा सीन होता तरी देखील मी सेटवर लवकर पोहोचले होते. चित्रीकरण संपल्यावर मला आणखी एक तास थांबण्यास सांगण्यात आले. पण मी थांबू शकत नव्हते. आम्ही गाण्याचे चित्रीकरण करत होतो. ते संपल्यावर जेव्हा मी कपडे बदलण्यासाठी माझ्या वॅनिटी व्हॅनमध्ये गेले तेव्हा निर्माते जबरदस्ती माझ्या व्हॅनमध्ये आले. ते माझ्या अंगावर ओरडू लागले आणि मी आणखी एक तास थांबायला हवे असे म्हणत होते. त्यानंतर कोरिओग्राफरने त्यांना व्हॅनमधून बाहेर काढले. त्यावेळी मला कोरिओग्राफरने मदत केली होती’ असे मंदाना पुढे म्हणाली.