ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याची सूत्रसंचालक एलेन डेगेनेरेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या हॉलिवूड तारे-तारकांबरोबरच्या सेल्फीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र धडाक्याने शेअर होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीनेसुद्धा एलेनचे अनुकरण केल्याचे पुढे आले आहे. सोमवारी (३ मार्च) मुंबईत पार पडलेल्या एका समारंभानंतर मंदिरा बेदीनेदेखील एलेन डेगेनेरेसच्या सेल्फीची कॉपी करीत शाहरूख खान, चित्रपटकर्ता कुणाल कोहली, पुनित मल्होत्रा आणि अन्य काही जण असलेले सेल्फी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. मुंबईत झालेल्या या समारंभात शाहरूख खानच्या हस्ते एका घड्याळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक बडी मंडळी उपस्थित होती.



हॉलिवूडमधील बड्या स्टार मंडळींबरोबर काढलेले एलेनाचे ग्रुप सेल्फी टि्वटरवर सर्वात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर शेअर होणारे छायाचित्र ठरले. अधिकाधिक नेटकऱ्यांमध्ये हे छायाचित्र शेअर होत असल्यामुळे काही काळासाठी ही सोशल मीडिया साईट बंद झाली होती. एलेनच्या सेल्फीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘फोर मोअर इयर्स’ नावाच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या विजयाच्या छायाचित्राने प्रस्थापित केलेला सोशल मीडियावरचा विक्रमदेखील मोडीत काढला. २०१२ साली निवडणुकीच्या रात्री ओबामा फर्स्ट लेडी मिशेल ओबामांना अलिंगन देत असतानाचे हे छायाचित्र ७,८०,००० पेक्षा जास्त वेळा रिटि्वट झाले.