हॉलिवूड दिग्दर्शक हार्वी वाइनस्टीनवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. सोशल मीडियावर ‘मी टू’ #MeToo हॅशटॅग वापरत जगभरातील महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. कास्टिंग काऊचबद्दल आता अभिनेत्री मंदिरा बेदीने विधान केलं आहे. ‘कास्टिंग काऊच प्रकरणात कधीही फक्त एकाची चूक नसते. दोघांच्या संमतीनंतरच असा प्रकार घडतो,’ असं तिने म्हटलं.

‘या इंडस्ट्रीमध्ये मी बऱ्याच वर्षांपासून असून माझ्यासोबत कधीच अशा प्रकारची घटना घडली नाही. चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अभिनेत्रींचं शोषण होतं, असं मी अनेकदा ऐकलं आहे. पण, हे कधीच एकतर्फी नसतं,’ असं मत तिने मांडलं.

सध्या मंदिराने वेब सीरिजकडे तिचा मोर्चा वळवला असून ‘व्होडका डायरीज’ या वेब सीरिजमध्ये ती भूमिका साकारत आहे. या वेब सीरिजसंदर्भातच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचसंदर्भात तिचे मत मांडले.