श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर चित्रपटात पुन्हा एकत्र
बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस हिट हिंदी चित्रपट देणाऱ्या मणिरत्नम यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक जोडीच्या ‘रावण’ या चित्रपटानंतर एकही हिंदी चित्रपट केलेला नाही. २००७ साली आलेला ‘गुरू’ आणि पुन्हा तीन वर्षांनी ऐश्वर्या-अभिषेक जोडीलाच घेऊन केलेल्या ‘रावण’ या चित्रपटानंतर दक्षिणेकडचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक हिंदीत उतरलेलाच नाही. खरेतर, ऐश्वर्याचे पुनरागमन मणिरत्नम यांच्या हिंदी चित्रपटाने व्हायचे होते. मात्र, तो चित्रपट प्रत्यक्षात कधी उतरणार याची वाट पाहून कंटाळलेल्या ऐश्वर्याने अखेर संजय गुप्ताचा ‘जजबा’ हा चित्रपट पूर्ण केला. मणिरत्नम यांचा हिंदी चित्रपट यायच्या आधी त्यांचा या वर्षी प्रदर्शित झालेला ‘ओ कढल कानमनी’ हा प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट मात्र हिंदीत येत आहे.
मणिरत्नम यांच्या ‘ओ कढल कानमनी’ या चित्रपटाचा रिमेक हिंदीत करण्यात येणार आहे. या रिमेकचे दिग्दर्शन मणिरत्नम यांचा शिष्य दिग्दर्शक शाद अली करणार असून याआधीही त्याने त्यांच्या एका चित्रपटाचा रिमेक केला होता. शाद अलीची बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून सुरुवात झाली ती ‘साथिया’ या चित्रपटाने. ‘साथिया’ हा मणिरत्नम यांच्या ‘अलायपयुथे’चा अधिकृत रिमेक होता. आता पुन्हा एकदा आपल्या गुरूच्या चित्रपटाचा रिमेक घेऊन शाद अली बॉलीवूडच्या मैदानात उतरणार आहे. ‘ओ कढल कानमनी’ हा मणिरत्नम यांचा आजच्या तरुण पिढीला अचूकपणे समजून घेऊन त्यांचे चित्रण करणारा खरा चित्रपट मानला जातो. या वर्षीच्या एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सहा कोटी रुपये खर्च आल आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला जवळ करणारी ही तरुण पिढी, त्यांच्या लग्नसंस्थेबद्दलच्या समस्या आणि एकमेकांच्या नात्यात अडकल्यानंतरही होणारी भावनिक गुंतागुंत हा या चित्रपटाचा विषय आहे.
हिंदीत या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही ‘आशिकी २’ची जोडी एकत्र येणार आहे. ‘आशिकी २’ नंतर या दोघांनाही एकत्र चित्रपटाविषयी विचारणा झाली होती. मात्र, त्या वेळी प्रेमबंधनात अडकलेल्या या जोडीने प्रत्यक्ष चित्रपटातून एकत्र काम करणे टाळले होते. आजघडीला श्रद्धा कपूरच्या नावावर दोन शंभर कोटींचे चित्रपट आहेत. तर आदित्यला अजूनही एका सुपरहिट चित्रपटाची गरज आहे. ‘ओ कढल कानमनी’च्या निमित्ताने मणिरत्नम यांनी गाजवलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र काम करण्याची संधी या दोघांनीही घेतली आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटाचा रिमेक हिंदीत पाहायला मिळणार असला तरी बॉलीवूडमध्ये ‘मणी’ सर म्हणून आदराने संबोधल्या जाणाऱ्या या दिग्दर्शकाचा हिंदी चित्रपट कधी येणार, याबद्दल खुद्द चित्रपटसृष्टीतही तितकीच उत्सुकता आहे.