आपल्या ठाम भूमिका आणि बेधडक वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘मणिकर्णिका…’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसोबतच आणखी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनयासोबतच ही ‘क्वीन’ आणखी एका क्षेत्रात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत. ते क्षेत्र म्हणजे राजकारण. बसला ना तुम्हालाही धक्का? कंगनाच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला असला तरीही याच चर्चांनी सध्या जोर धरला असल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे.

कंगनाने आतापर्यंत बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून तिच्या अभिनयाने आणि समजूतदारपणाने मोदींचे मन जिंकले आहे. जवळपास वर्षभरापूर्वीसुद्धा कंगनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपलं योगदान दिलं होतं. जेथे एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्वच्छतेचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. एकंदर सरकारी उपक्रमांमध्ये तिचं योगदान आणि स्थानिक राजकारणात चांगलं काम करण्याची इच्छा या साऱ्याच्या बळावर ती हिमाचल येथूनच राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याची चर्चा आहे.

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील मतदार संघातून भाजपाच्या बाजूने राजकारणात उतरु शकते. गेल्या काही दिवसांपासून ती या भागातील राजकारण आणि एकंदर त्यादृष्टीने असणारं वातावरण या सर्व गोष्टींविषयी जाणून घेत आहे. त्याशिवाय चित्रपटांची निवड करण्यातही ती बरीच सावधगिरी बाळगताना दिसत आहे. आपली प्रतिमा कोणत्याही प्रकारे मलिन होऊ नये याचीच ती काळजी घेताना दिसतेय. तेव्हा आता येत्या काळात कंगना खरंच राजकारणात प्रवेश करणार की या चर्चा अफवा असल्याचं सांगत याविषयी बोलणं टाळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.