राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौत यामध्ये झाशीच्या राणीची मुख्य भूमिका साकारत आहे.

मणिकर्णिका ते देशसेवेत आपले प्राण पणाला लावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हा संपूर्ण प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. झाशीच्या राणीच्या भूमिकेतील कंगना या टीझरमध्ये विशेष लक्ष वेधून घेते. तलवारबाजी करणारी, मांडीवर बाळाला घेऊन राजगादी सांभाळताना, घोडदौड करणारी झाशीची राणी यामध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मणिकर्णिका’ बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपटाच्या कथानकावरून त्याला आधी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट अर्ध्यावर सोडला. जेव्हा कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तेव्हा अभिनेता सोनू सूदनेही काढता पाय घेतला. कंगनाच्या वारंवार हस्तक्षेपामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. अखेर कंगनाला चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय मिळालं.  कंगनासोबतच यामध्ये अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्झोपा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.