ठाकरे आणि मणिकर्णिका हे दोन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांना खास महत्त्व आहे. कारण ठाकरे हा सिनेमा बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. तर मणिकर्णिका हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर आहे. आता प्रश्न उरतो तो या दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा. या दोन्ही चित्रपटांच्या एक दिवसाच्या कमाईचा विचार केला तर कंगनाने नवाजुद्दीन सिद्दीकीवर मात केली आहे असंच दिसून येतं आहे.

ठाकरे या बहुचर्चित सिनेमाने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकर तरण आदर्श यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे कंगनाच्या मणिकर्णिकाने मात्र 8 कोटी 75 लाखांचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच काय तर ठाकरे या सिनेमाच्या तुलनेत मणिकर्णिका या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. मणिकर्णिका सिनेमातली मध्यवर्ती भूमिका कंगना रणौतने साकारली आहे.

हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ठाकरे हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ठाकरे या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तीरेखा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. तर अमृता रावने मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे.

ठाकरे आणि मणिकर्णिका या दोन्ही सिनेमांचा विचार केला तर हे दोन्ही बायोपिकच आहेत. ठाकरे सिनेमा बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर तर मणिकर्णिका झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आहे. या दोन सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विचार केला तर कंगना रणौतने नवाजुद्दीनला मागे टाकले आहे असेच म्हणता येईल.